TATA सोबत डील सुपरहीट! ‘या’ कंपनीवरील विश्वास अनेक पटींनी वाढला, विक्रीतून होतोय मोठा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:43 PM2021-12-01T19:43:25+5:302021-12-01T19:48:10+5:30

TATA 1MG: देशातील २० हजारपेक्षा अधिक पिन-कोडपर्यंत ई-फार्मसी आणि ई-डायग्नोस्टिक्स आणि ई-कंन्सल्टची सेवा ही कंपनी देत आहेत.

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. TATA ग्रुप जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

यातच आता TATA ग्रुप ई-कॉमर्स क्षेत्रात विस्तार करण्यासाठी नवीन दमदार योजना आखत असून, काही कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा विचार TATA समूह करत आहे. अलीकडेच TATA ने देशातील सर्वांत मोठी ई-ग्रॉसरी कंपनी बिग बास्केटचे अधिग्रहण केले होते.

यानंतर आता TATA ग्रुपने देशातील आघाडीची ई-हेल्थ केअर कंपनी 1MG बरोबरची डील जवळपास पूर्णत्वास नेली आहे. TATA सोबत केलेल्या या डीलनंतर 1MG कंपनीवरील देशवासीयांचा विश्वास अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

TATA सोबतची डील आमच्यासाठी अनेक स्तरांवर फायद्याची ठरले आहे. तसेच लोकांचा आमच्यावरील विश्वास मोठ्या प्रमाणावर आहे, असे 1MG चे संस्थापक गौरव अग्रवाल यांनी एका चर्चासत्रात बोलताना सांगितले. सध्या 1MG मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून, देशातील २० हजारपेक्षा अधिक पिन-कोडपर्यंत ई-फार्मसी आणि ई-डायग्नोस्टिक्स आणि ई-कंन्सल्टची सेवा देत आहेत.

सन २०१५ मध्ये 1MG ची स्थापना झाली होती. वेबसाइटनुसार, ऑनलाईन डॉक्टर, ऑनलाईन औषधे, लॅब टेस्ट, ब्लड टेस्ट अशा मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याशिवाय इथे आयुर्वेदिक औषधेही मिळतात.

तसेच कोरोना चाचण्या, सल्ला अशा सुविधाही देण्यात येत आहेत. ई फार्मसी व्यवसाय वेगाने वाढत आहे. काही रिपोर्टनुसार, भारतात ई-फार्मसी बिझनेस २०२३ पर्यंत २.७ अब्ज डॉलर वाढले, असे सांगितले जात आहे. या उद्योगाची उलाढाल २५०० कोटींपर्यंत आहे, असे म्हटले जात आहे.

TATA ग्रुपमधील टाटा सन्स कंपनीची सहाय्यक कंपनी असलेल्या Tata Digital ने 1MG सोबत सन २०२१ च्या सुरुवातीला डील केली होती. यानुसार टाटा डिजिटलकडे आता 1MG चे ५० टक्क्यांहून अधिक स्टेक आहे.

या डीलनंतर ही कंपनी आता TATA 1MG या नावाने ओळखली जाते. यासंदर्भात बोलताना गौरव अग्रवाल म्हणाले की, आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास सर्वांत महत्त्वाचा असतो. ग्राहकांची हीच सर्वांत मोठी गुंतवणूक असते. तसेच आताच्या घडीला भारतात TATA ग्रुपपेक्षा अधिक विश्वासार्ह ब्रँड कोणताच नाही. यावरच देशवासीयांचा सर्वांत जास्त विश्वास आहे.

TATA ट्रस्ट देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असून, मागास क्षेत्रासाठी विविध प्रकारची कार्ये करत आहे. तसेच मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य आणि मूलभूत सुविधा प्रदान करण्यावर टाटा ट्रस्टचा अधिक भर असल्याचे सांगितले जाते.

टाटा ट्रस्ट स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकासाच्याही अनेक योजना राबवताना पाहायला मिळते. आम्हाला आनंद आहे की, TATA सोबत आम्ही भागीदारी केली. ही भागीदारी आमच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. म्हणूनच आम्ही डील केली, असेही गौरव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

गेल्या सुमारे १८ महिन्यांपासून TATA आणि 1MG ऑनलाइन आरोग्य सेवा क्षेत्रात काम करत आहेत. यानंतर या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेली डील अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

TATA आणि 1MG आरोग्य सेवा क्षेत्रातील विस्तारासाठी नवीन योजनांवर काम करत आहेत. यामुळे बाजारातील हिस्सा आणि शेअर्समध्ये वाढ होईल, असा विश्वास गौरव यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रिलायन्स रिटेलनेही नेट मेड्स या कंपनीतील मोठी हिस्सेदारी ६२० कोटी खर्च करून खरेदी केली आहे.