रतन टाटा मस्क आणि बेझोसना घाम फोडणार; लवकरच मोठा धमाका करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 01:59 PM2021-08-12T13:59:37+5:302021-08-12T14:05:31+5:30

टाटा समूह नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत; बातचीत अंतिम टप्प्यात

उद्योग क्षेत्रातले अतिशय आदरणीय व्यक्तीमत्त्व असलेल्या रतन टाटांनी आता नव्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. भविष्याचा वेध घेऊन टाटा नव्या उद्योगात नशीब आजमवणार आहेत. त्यासाठी टाटा कंपनी एका कॅनेडियन कंपनीशी चर्चा करत आहे.

भविष्याचा विचार करून टाटा समूहानं टीसीएस सुरू केली. काळाच्या पुढे जाऊन टीसीएस सुरू करण्याचा घेतलेला निर्णय टाटासाठी लाभदायी ठरला. आजही टाटा समूहाच्या एकूण महसुलात टीसीएसचा वाटा लक्षणीय आहे.

आता टाटा समूहानं आणखी एका महत्त्वाकांक्षी व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं आहे. टाटा समूह सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात बलाढ्य प्रतिस्पर्धी भिडताना दिसतील.

सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात उतरताना टाटा समूह कॅनेडाची कंपनी टेलीसॅटसोबत करार करणार आहे. त्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे. टाटा समूहातील नेल्को कंपनी सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा भारतात आणण्यासाठी टेलिसॅटसोबत बातचीत करत आहे.

नेल्को आणि टेलिसॅट कंपन्यांची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. या सेवेची चाचणी लवकरच सुरू होऊ शकते. टेलिसॅटकडे एक मोठा सॅटेलाईट ब्रॉडब्रँड प्लान आहे. त्यासाठी ३७ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

सॅटेलाईट ब्रॉडबँडच्या माध्यमातून सेवा सुरू झाल्यास इंटरनेटचा वेग वाढेल. सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा दुर्गम भागांसाठी जीवनरेषा ठरेल. ज्या ठिकाणी वायर्ड इंटरनेट सेवा पोहोचणं अवघड आहे, त्या ठिकाणी सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचू शकेल.

टाटा समूह सॅटेलाईट ब्रॉडबँड क्षेत्रात उतरल्यानंतर तगडी स्पर्धा पाहायला मिळू शकते. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क लवकरच भारतात सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरू करणार आहेत. स्टारलिंकच्या माध्यमातून ते सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा देतील.

मस्क यांच्या स्टारलिंकनं सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवेसाठी प्री बुकिंग सुरू केलं आहे. २०२२ मध्ये स्टारलिंकची सेवा सुरू होईल. तिचा वेग १५० एमबीपीएस असेल.

भारती एअरटेलदेखील सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा क्षेत्रावर भर देत आहे. तर ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेझोसदेखील या क्षेत्रात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते भारतात असल्यानं भारत जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

भारतात कोट्यवधी लोक इंटरनेटचा वापर करतात. मात्र आजही अनेक भागांमध्ये इंटरनेटचा वेग कमी आहे. या भागांमध्ये इंटरनेट सेवेचा दर्जा सुधारण्याची गरज आहे.

रिलायन्स जिओनं इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवली आहे. जिओच्या आगमनापूर्वी इंटरनेट सेवा महाग होती. मात्र जिओनं इंटरनेट सेवा अतिशय कमी किमतीत देण्यास सुरुवात केली. इंटरनेट सेवा अतिशय नाममात्र किमतीत उपलब्ध असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होतो.