TCS चे पाऊल पडते पुढे! मार्केट कॅपच्या ‘टॉप १०’ कंपन्यांत दमदार कामगिरी; कमावला सर्वाधिक नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 02:19 PM2021-12-05T14:19:40+5:302021-12-05T14:24:20+5:30

शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणात वाढले असून, पैकी सर्वाधिक फायदा TCS ला झाल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. मात्र, तरीही काही कंपन्या उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. यामुळे गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत.

यातच शेअर मार्केटमधील काही कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेअर बाजारातील चढ-उतारांचा या कंपन्यांच्या कामगिरीवर फारसा परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही. उलट कमाई वाढल्याचे दिसून आले.

शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजेच बाजारमूल्य आठवडाभरात १,२९,०४७.६१ कोटी रुपयांनी वाढले. यामधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) याच काळात सर्वांत जास्त फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

शेअर मार्केटमधील चढ-उताराच्या काळातही टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे मार्केट कॅप वधारले. तर, याच कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचे मार्केट कॅप घटल्याचे पाहायला मिळत आहे.

एका अहवालानुसार, TCS चे मार्केट कॅप ७१,७६१.५९ कोटी रुपयांनी वाढले आहे. तर, इन्फोसिसचे मार्केट कॅप १८,६९३.६२ कोटी रुपयांनी वाढून ७,२९,६१८.९६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

तर, बजाज फायनान्सचे मार्केट कॅप १६,०८२.७७ कोटी रुपयांनी वाढून ४,२६,७५३.२७ कोटी रुपये झाले असून, HDFC बँकेचे मार्केट कॅप १२,७४४.२१ कोटी रुपयांनी वाढून ८,३८,४०२.८० कोटी रुपये झाले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन २,४०९.६५ कोटी रुपयांनी वाढून ४,२२,३१२.६२ कोटी रुपयांवर पोहोचले.

दुसरीकडे, हिंदुस्तान युनिलिव्हरने या कालावधीत १,९६१.९१ कोटी रुपये नफा कमावला असून, मार्केट कॅप आता ५,५०,५३२.७३ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. यासह काही कंपन्यांचे मार्केट कॅप घटले आहे.

भारती एअरटेलचे मार्केट कॅप १०,४८९.७७ कोटी रुपयांनी घसरून ३,९४,५१९.७८ कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे मार्केट कॅप ३,६८६.५५ कोटी रुपयांनी घसरून ४,९७,३५३.३६ कोटी रुपये झाले असून, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप २,५३७.३४ कोटी रुपयांनी घसरून १५,२७,५७२.१७ कोटी रुपयांवर आले आहे.

टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत.

तर मार्केट कॅपमध्ये क्रमांक एक वर असलेल्या TATA ग्रुपचा मार्केट कॅप २१.९९ लाख कोटींवर गेला आहे. १८ ऑक्टोबर रोजी TATA ग्रुपचा मार्केट कॅप २३.६९ लाख कोटींवर होता. मात्र, त्यात १.७० लाल कोटींची घसरण झाली. TATA ग्रुपमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीचा शेअर सर्वाधिक आहे.

TATA ग्रुपमधील टीसीएसनंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. Titan कंपनीचा मार्केट कॅप २.२९ लाख कोटी आहे. शेअर मार्केटमधील सूचीबद्ध ग्रुपचे एकूण मार्केट कॅप २७४ लाख कोटींवर आहे.