१ ऑगस्टपासून सॅलरी, ATM, EMI बाबत होणार मोठे बदल; पाहा सामान्यांवर काय पडणार फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:05 PM2021-07-31T14:05:06+5:302021-07-31T14:16:34+5:30

Rules Change from 1st August: १ ऑगस्ट पासून बँकेशी निगडीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. पाहूया कोणते झालेत बदल आणि काय होणार सामान्यांवर परिणाम.

१ ऑगस्टपासून बँकेशी निगडीत काही नियम बदलणार आहेत. जर महिन्याच्या पहिल्या तारखेला शनिवार किंवा रविवार अथवा राष्ट्रीय सुट्टी आली तर तुमचं पेन्शन किंवा वेतन थांबवणार नाही.

नव्या नियमांनुसार आता पहिल्या तारखेलाच तुमचं वेतन किंवा पेन्शन तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) १ ऑगस्टपासून सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे. याचाच अर्थ वेतन १तारखेला खात्यात जमा होण्यास कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

याव्यतिरिक्त जर आठवड्याच्या अखेरिस न होणारे ईएमआय, म्युच्युअल फंडाचे हप्ते, गॅस, टेलिफोन बिल अन्य बिलांची रक्कम भरण्यासारखी कामंही आता सहजरित्या पूर्ण केली जाऊ शकतील.

१ तारखेपासून एटीएममधून पैसे काढणंही महाग होणार आहे. जून महिन्यात रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार एटीएमची इंटरचेंज फी १५ रूपयांवरून वाढवून १७ रूपये करण्यात आली आहे.

तबब्ल ९ वर्षांनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनमध्ये बदल करण्यात आले आहे. एटीएमच्या मेन्टेनन्सवर आणि त्याच्या डेव्हलपमेंटवर अधिक खर्च होत असल्यानं ही फी वाढवण्यात आली आहे.

याशिवाय नॉन फायनॅन्शिअल ट्रान्झॅक्शन्स (Non-Financial Transaction Charges) फीदेखील ५ रूपयांवरून वाढवून ६ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेनं (India Post Payments Bank) या महिन्याच्या सुरूवातीलाच याबाबत माहिती दिली होती. बँक आता १ ऑगस्टपासून डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी (Door Step Banking Services Charge) अधिक शुल्क आकारलं जाणार आहे.

IPPB नुसार आता दर महिन्याला Door Step Banking सेवांसाठी २० रूपये अधिक जीएसटी असं शुल्क द्यावं लागणार आहे.

जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसारख्या (Sukanya Samriddhi Yojana Charges) पोस्ट ऑफिसशी निगडीत सेवांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्यासाठीही २० रूपये अधिक जीएसटी असं शुल्क द्यावं लागेल.

आयसीआयसीआय बँकेनंदेखील १ ऑगस्टपासून नवे नियम लागू केले आहेत. सेव्हिंग अकाऊंटच्या खातेधारकांसाठी बँकेनं नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

ICICI बँकेनं आपल्या सेव्हिंग अकाऊंट होल्डरना रोख रकमेच्या देवाणघेवाणीसाठी (ICICI Cash Transaction Charges), एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक चार्जच्या नियमात बदल केले आहेत.

बँकेनं याबाबत आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. तसंच सहा मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना एका महिन्याच्या आत केवळ ३ मोफत ट्रान्झॅक्शन्स करता येणार आहेत. त्यानंतर सातव्या ट्रान्झॅक्शनपासून शुल्क लावण्यास सुरूवात होणार आहे.

अन्य ठिकाणांसाठी पाच ट्रान्झॅक्शन्सची सूट देण्यात आली आहे. याशिवाय लिमिट संपल्यानंतर ट्रान्झॅक्शनसाठी ग्राहकांकडून २० रूपयांपर्यंच शुल्क आकारलं जाईल.

तर दुसरीकडे तुम्ही आपल्या होम ब्रान्चमधून महिन्याला १ लाख रूपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकता. जर तुम्हाला त्यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास १५० रूपये शुल्क द्यावं लागेल.