TATA And Reliance: दोन दिग्गज भिडणार! ‘या’ क्षेत्रासाठी टाटा-अंबानींमध्ये स्पर्धा; दोन्ही कंपन्यांचे मेगा प्लान तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 01:43 PM2022-05-18T13:43:44+5:302022-05-18T13:48:49+5:30

TATA And Reliance: टाटा समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रिजने जय्यत तयारी सुरू केली असून, या क्षेत्रात कोण बाजी मारणार हे येणारा काळ ठरवेल, असे सांगितले जात आहे.

रतन टाटांचा टाटा समूह आणि मुकेश अंबानी यांची रिलायन्स अनेकविध क्षेत्रात कार्यरत आहेत. दोन्ही समूह मोठ्या प्रमाणावर आपल्या कक्षा रुंदावताना दिसत आहेत. कोरोना काळात एकीकडे भीषण परिस्थिती असताना, या समूहातील काही कंपन्यांनी याच काळात मोठी झेप घेतल्याचे दिसून आले.

यातच आता एका क्षेत्रातील कमाल कामगिरी हे दोन्ही समूह एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी या दोन्ही समूहातील संबंधित कंपन्यांनी जय्यत तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.

देशातील दोन मोठ्या औद्योगिक घराण्यांमध्ये आता स्पर्धा लागणार आहे. कारण, देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील कंपनी ६.५ अब्ज डॉलरचा ग्राहकोपयोगी वस्तूंचा व्यवसाय उभारणार आहे. इतकेच नाहीतर किराणा आणि नॉन-फूड ब्रँड्स खरेदी करण्याची योजना कंपनीकडून आखण्यात आली आहे.

दुसरीकडे, टाटा समूहानेही (Tata Group)या क्षेत्रासाठी मोठी योजना तयार केली असून ग्रुपची फूड अँड बेव्हरेज कंपनी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (Tata Consumer Products)क्षेत्रातील आपलं स्थान आणखी घट्ट करण्यासाठी पाच ब्रँड खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्राहकांसाठीदेखील ही मोठी संधी असणार आहे.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डिसूझा यांनी एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. 'भविष्यात कंपनीला मोठं करण्यासाठी ही तयारी सुरू असून Tetley चहा आणि Eight O’Clock कॉफी विकणाऱ्या या कंपनीच्या अनेक कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. पण याबद्दल डिसोझा यांनी कोणतीही नावं उघड केली नाहीत.

या सेक्टरमध्ये टाटा कंपनीची टक्कर यूनिलीवरसारख्या (Unilever) मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत होणार आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, रिलायन्सने सहा महिन्यांत ५०-६० किराणा, घरगुती आणि पर्सनल केअर ब्रँडचा पोर्टफोलिओ तयार करण्याची योजना आखली आहे.

हे ब्रँड देशभरातील रिटेल आउटलेटवर नेण्यासाठी कंपनी वितरकांचे मोठे नेटवर्क तयार करत आहे. यासाठी रिलायन्स रिटेल कन्झ्युमर ब्रँड्स तयार केले जाईल. रिलायन्सची देशभरात २००० हून अधिक किराणा दुकाने आहेत आणि ती JioMart च्या ई-कॉमर्स नावाने चालतात.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई शिगेला पोहोचलेली असताना टाटा ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात आपली कामगिरी वाढवत आहे. युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि डाबर इंडिया सारख्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत आणि स्वस्त पॅकेजमधील वस्तूंचे प्रमाणही कमी केले आहे. मात्र, कॉफी, चहा आणि मिठाच्या किमतीत कोणताही विशेष बदल न झाल्याने टाटा कंपनीला याचा फटका बसला नाही.