Post Office change rules: उद्यापासून पोस्ट ऑफिसचे ATM कार्ड व व्यवहाराशी संबंधित नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 04:32 PM2021-09-30T16:32:52+5:302021-09-30T17:49:54+5:30

Post Office change rules: हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहेत.

नवी दिल्ली : जर तुमचे देखील पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) खाते असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिसमधील बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहेत.

1 ऑक्टोबरपासून एटीएम (ATM) कार्डवरील शुल्कामध्ये बदल होणार आहे. पोस्ट ऑफिसने एक परिपत्रक जारी करून याबाबतची मा हिती दिली आहे.पोस्ट विभागाने एका महिन्यात एटीएमद्वारे केले जाणारे वित्तीय आणि नॉन वित्तीय व्यवहार मर्यादित केले आहेत.

1 ऑक्टोबरपासून पोस्ट ऑफिस एटीएम/डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये + जीएसटी असेल. दरम्यान, हे शुल्क 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत लागू राहतील.

इंडिया पोस्ट आता ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएस अलर्टसाठी 12 रुपये + जीएसटी शुल्क आकारणार आहे.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस एटीएम वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जर तुमचे एटीएम 1 ऑक्टोबरनंतर हरवले असेल तर तुम्हाला दुसरे डेबिट कार्ड मिळवण्यासाठी 300 रुपये + जीएसटी शुल्क भरावे लागेल. तसेच, जर एटीएम पिन हरवला असेल तर दुसऱ्या पिनसाठी देखील शुल्क भरावे लागेल. यासाठी ग्राहकांना 50 रुपये + जीएसटी शुल्क भरावे लागेल.

ग्राहकाला खात्यात किमान बॅलन्स ठेवणे देखील आवश्यक असेल. जर बचत खात्यात बॅलन्स नसल्यामुळे एटीएम किंवा पीओएस व्यवहार नाकारला गेला तर ग्राहकाला त्यासाठी 20 रुपये + जीएसटी भरावा लागेल.

नवीन नियमांनुसार, बेसिक बचत खात्यात एका महिन्यात 5 व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर होणाऱ्या व्यवहारावर 10 रुपये आणि पैसे काढण्यावर जीएसटी आकारला जाईल.