टाटाच्या 'या' कंपनीतून सरकार आपला हिस्सा विकणार; ९ हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:43 PM2021-03-13T13:43:10+5:302021-03-13T13:50:59+5:30

केंद्र सरकार आता टाटाच्या एका कंपनीतील आपली हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती मिळाली आहे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड (tata communications) कंपनीमधील आपला संपूर्ण हिस्सा सरकार विकणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार (PM Narendra Modi govt) निर्गुंतवणुकीतून सुमारे दीड लाख कोटी रुपये उभे करण्यावर काम करत असून, याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.

केंद्र सरकार निर्गुंतवणूक योजनेवर युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. निती अयोगाने (Niti Ayog) केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयांना येत्या काही वर्षात विक्री करता येईल, अशा मालमत्तांची माहिती घेण्यास सांगितले आहे.

आगामी चार वर्षांत जवळपास १०० कंपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या योजनेवर सरकारचे काम सुरू झाले असून, नीती आयोग प्रॉपर्टीज आणि कंपन्यांची यादी तयार करीत आहे. जेणेकरून येत्या काही दिवसांत त्यांची विक्री करण्यासाठी शेड्युल केले जाऊ शकते.

याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार आता टाटाच्या एका कंपनीतील आपली हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती मिळाली आहे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड (tata communications) (आधीची विदेश संचार निगम लिमिटेड) कंपनीमधील आपला संपूर्ण हिस्सा सरकार विकणार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारकडून हा हिस्सा खुल्या बाजारात विक्री होईल, असे सांगितले जात आहे. सरकारचा उर्वरित हिस्सा टाटा सन्सची गुंतवणूक असलेल्या पेनाटोन फिनवेस्ट लिमिटेड या कंपनीला विकणार असल्याचे म्हटले जात आहे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमध्ये सरकारचा २६.१२ टक्के हिसा आहे. (pm narendra modi govt to sold its entire stake in tata communications)

टाटा कम्युनिकेशन्समध्ये पोनाटोन फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा ३४.८ टक्के हिस्सा आहे. तर टाटा सन्सचा १४.०७ टक्के हिस्सा आहे. केंद्र सरकारचे टीसीएल कंपनीत सात कोटी ४४ लाख ४६ हजार ८८५ शेअर्स आहेत. ताज्या माहितीनुसार शेअर बाजारात टीसीएलच्या शेअरची किंमत १ हजार २८९.७५ रुपये आहे. यानुसार, केंद्र सरकारला यातून ९ हजार ६०१ कोटी रुपये मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.

टाटा कम्युनिकेशन्समधील एकूण शेअर्सपैकी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ५९ लाख ४६ हजार ८८५ शेअर्स म्हणजेच १६.१२ टक्के हस्सा सरकार शेअर बाजारात खुल्या पद्धतीने विकणार आहे. शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यानंतर उर्वरित हिस्सा पेनाटोन फेनविस्ट लिमिटेड कंपनीला विकला जाणार आहे.

या व्यवहारानंतर सरकारची टाटा कम्युनिकेशन्समध्ये कोणतीही गुंतवणूक राहणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. १९८६ मध्ये VSNL कंपनीची स्थापना केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. यानंतर २००२ मध्ये २५ टक्के हिस्सा पेनाटोन फेनविस्ट लिमिटेड कंपनीला विकण्यात आला होता. यानंतर या कंपनीचे नामकरण टाटा कम्युनिकेशन्स करण्यात आले होते.

दरम्यान, १०० बंद सरकारी मालमत्तांची विक्री करून सरकार निधी उभारण्याचे काम करीत आहे. नवीन आकडेवारीनुसार, जवळपास ७० पेक्षा जास्त सरकारी कंपन्या तोट्यात आहेत. यामध्ये राज्याद्वारे संचालित युनिट्सचाही समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ज्या युनिट्सनी ३१,६३५ कोटी रुपयांचे संयुक्त नुकसान झाल्याची सूचना दिली होती, ते आता सर्व तोट्यातील युनिट्स सरकारला बंद करायचे आहेत. कार्यक्षमता खासगी क्षेत्रातून येते, रोजगार उपलब्ध आहे. खाजगीकरण, मालमत्तांच्या विक्रीतून, जे पैसे येतील ते जनतेवर खर्च केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणुकीद्वारे सरकारने १.७५ लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे असे मानले जात आहे की, सरकार जुलै ते ऑगस्टपर्यंत एअर इंडिया आणि बीपीसीएलसाठी निर्गुंतवणुकीची योजना पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.