एव्हिएशन क्षेत्रात मोठी मागणी! कोणत्या एअरलाइनकडे किती पायलट? संसदेत आकडेवारी सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:52 IST2025-12-09T10:40:39+5:302025-12-09T10:52:01+5:30

Aviation Sector : भारतीय विमान वाहतूक क्षेत्र मोठ्या वेगाने विस्तारत असताना, देशातील प्रमुख एअरलाइन्समध्ये कार्यरत असलेल्या वैमानिकांच्या संख्येची माहिती सोमवारी संसदेत सादर करण्यात आली. देशातील एकूण ६ प्रमुख देशांतर्गत एअरलाइन्समध्ये जवळपास १३,९८९ वैमानिक सेवा देत आहेत.

देशातील सहा प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांमध्ये सध्या एकूण १३,९८९ वैमानिक कार्यरत आहेत. देशाच्या एव्हिएशन क्षेत्रातील वाढत चाललेला विस्तार आणि मनुष्यबळाची मागणी या आकडेवारीतून स्पष्ट होते.

एअर इंडिया आणि तिची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेस या समूहाकडे सर्वाधिक वैमानिक आहेत. एअर इंडियाकडे ६,३५० आणि एअर इंडिया एक्सप्रेसकडे १,५९२ असे एकूण ७,९४२ पायलट आहेत. विस्ताराच्या योजनांमुळे एअर इंडिया समूहात मोठी भरती सुरू आहे.

बाजारातील सर्वात मोठी एअरलाइन असलेल्या इंडिगोमध्ये ५,०८५ वैमानिक तैनात आहेत. इंडिगोचे देशांतर्गत बाजारपेठेतील मोठे स्थान आणि विमानांचा मोठा ताफा सांभाळण्यासाठी ही मोठी संख्या आवश्यक आहे.

नवीन एअरलाइन अकासा एअर मध्ये ४६६ वैमानिक कार्यरत आहेत, तर बजेट एअरलाइन स्पाइसजेटमध्ये ३८५ पायलट आहेत. सरकारी एअरलाइन अलायन्स एअरमध्ये १११ वैमानिक सध्या कार्यरत आहेत.

परदेशी वैमानिकांची भरती पूर्णपणे बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते, असे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. विमानांचा ताफा वाढवणे आणि विशिष्ट प्रकारच्या विमानांसाठी तातडीने पायलटची गरज असल्यामुळे ही नियुक्ती केली जाते.

देशातील फ्लाइंग ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर नागरी उड्डाण मंत्रालय लक्ष देत आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारतात ४० उड्डाण प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत, जे ६२ बेसवरून प्रशिक्षण देतात. DGCA ने नोव्हेंबरपर्यंत उड्डाण प्रशिक्षण संस्थांसाठी ६१ नवीन प्रशिक्षण विमानांना मंजुरी दिली आहे.

प्रशिक्षण इन्फ्रास्ट्रक्चरचे आधुनिकीकरण हा पूर्णपणे बाजारावर आधारित निर्णय असून, उड्डाण प्रशिक्षण संस्थांच्या व्यावसायिक निर्णयांवर अवलंबून असतो. प्रशिक्षण विमानांचा ताफा आधुनिक ठेवण्याची जबाबदारी थेटपणे मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नाही, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

डीजीसीए मजबूत नियामक संरचनेद्वारे उड्डाण प्रशिक्षण संस्थाच्या प्रशिक्षण गुणवत्ता आणि क्षमतेचे नियमित मूल्यांकन करते. आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनेच्या मानकांनुसार प्रशिक्षण आणि नियामक चौकट राखली जाते, तसेच सुरक्षेच्या मानकांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष सुरक्षा ऑडिट आणि स्पॉट चेकही केले जातात.