Perfume : अत्तराचा जन्म कसा झाला? ऐक 'अत्तरा' तुमची कहाणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 07:26 PM2022-01-15T19:26:19+5:302022-01-15T19:36:08+5:30

अत्तर तयार कसे होते? कन्नौजमध्ये डेग आणि भपका (म्हणजे मोठा रांजण आणि वाफ) यांचा वापर करत पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने अत्तर तयार केले जाते. कोणत्याही यंत्राचा वगैरे वापर त्यासाठी केला जात नाही.

उत्तर प्रदेशातील या प्रत्येक शहराची स्वत:ची म्हणून एक खासियत आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, व्यापारी वगैरे किनार त्यास आहे. याच पठडीतले आणखी एक शहर म्हणजे कन्नौज.

अत्तराच्या व्यवसायासाठी ओळखले जाणारे हे शहर सध्या या अत्तराच्या निर्मात्यांमुळेच देशभर चर्चेचा विषय ठरले आहे. या आटपाट नगरातील ही अत्तराची कहाणी...

कन्नौजमधील एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरात २०० कोटींचे घबाड सापडल्यानंतर आसपासच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासारख्या होत्या. साध्या दुचाकीवर शहरभर फिरणाऱ्या या माणसाकडे एवढे पैसे असतील, असे कधी वाटलेच नाही, हा या साऱ्या प्रतिक्रियांचा लघुत्तम सामाईक विभाजक अर्थात लसावि होता.

असो. या व्यापाऱ्यावरील धाडसत्र, त्याच्याकडे सापडलेले घबाड आणि या सगळ्यामागचे राजकारण हा काही आपला फोकस नाही. कन्नौज आणि अत्तर असा विषय आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी गंगा आणि काली या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या कन्नौजला अत्तर निर्मितीचा फार मोठा इतिहास आहे. इसवी सन ६०६ ते ६४७ या काळात उत्तर भारतावर एकछत्री अंमल असलेला राजा हर्षवर्धन याने या उद्योगाला राजाश्रय दिला.

तेथून सुरू झालेला हा सुगंधी व्यवसाय मुघलांच्या काळात आणखी बहरला. मुघल बादशहांना अत्तराबरोबरच सुगंधी तेलांचा पुरवठा कन्नौज शहराने कित्येक शतके केला आहे. फुले, वनौषधी, फळे, लाकूड, मुळे, राळ व गवत इत्यादींचा वापर अत्तर तयार करण्यासाठी केला जातो.

अत्तर तयार कसे होते? कन्नौजमध्ये डेग आणि भपका (म्हणजे मोठा रांजण आणि वाफ) यांचा वापर करत पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने अत्तर तयार केले जाते. कोणत्याही यंत्राचा वगैरे वापर त्यासाठी केला जात नाही.

एका मोठ्या रांजणात पाणी आणि ज्यांच्यापासून अत्तर तयार करायचे आहे त्या वस्तू एकत्र ठेवून रांजणाला विशिष्ट तापमानावर गरम केले जाते. त्यातून तयार होणारे बाष्प एका हवाबंद नळीत जमा केले जाते. त्याच्यापासून पुढे अत्तर तयार केले जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असली तरी त्याचे अंतिम निष्कर्ष ‘सुगंधी’ असतात, हे नक्की. विशेष म्हणजे अत्तर तयार करताना कोणत्याही प्रकारच्या मद्यार्कांचा वापर कटाक्षाने टाळला जातो, ही कन्नौजच्या अत्तराची खासियत. या संपूर्ण प्रक्रियेत नैसर्गिक साधनांचाच वापर केला जातो.

अत्तर निर्मितीदरम्यान निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचाही वापर केला जातो. जसे की, गुलाबाच्या पाकळ्या किंवा चंदनाच्या पाकळ्यांचा वापर अगरबत्ती तयार करण्यासाठी तर उरलेल्या सांडपाण्याचा वापर अंघोळीसाठी केला जातो.

सर्वात महागडे अत्तर कनौजमध्ये जगातील सर्वात स्वस्त अत्तरापासून सर्वात महाग अत्तरांपर्यंत सर्व प्रकारची अत्तरे तयार केली जातात. ‘अदरऊद’ हे येथे तयार करण्यात येणाऱ्या अत्तरांपैकी सर्वात महागडे अत्तर आहे. आसाममधील खास लाकडापासून हे अत्तर तयार करण्यात येते. जवळपास पाच हजार रुपये एक ग्रॅम अशी या अत्तराची किंमत आहे. अत्तराचा वापर कशाकशात? पान मसाला, मिठाई, आइस्क्रीम, शीतपेये

देशातील सर्वोत्तम अत्तर ब्रॅण्ड्स अल नुआम, चॉकलेट मस्क, ॲरोकेम, अल-रिहाब, सिल्व्हर, अल-रिहाब, सिबाया, स्विस अरेबियन जेनेट, अल फिरदौस ग्रीन, अल-हरमन मदिना अत्तर, अल-हरमन हजर अत्तर, रासासी सोनिया अत्तर