Paytm देतेय IPO गुंतवणुकीची संधी! UPI मधून ५ लाख गुंतवू शकता; पाहा, सोपी प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:42 PM2022-05-03T12:42:59+5:302022-05-03T12:48:38+5:30

पेटीएमने महाराष्ट्रातील एचएनआय गुंतवणूकदारांना 'यूपीआय'द्वारे ५ लाखांपर्यंत आयपीओ योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा सुरु केली आहे.

सध्या शेअर मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत असले, तरी अनेकविध कंपन्यांचे IPO एकामागून एक धडकत आहेत. आताच्या घडीला LIC च्या सर्वांत मोठ्या IPO ची चर्चा आहे. अशावेळी Paytm ने युझर्ससाठी एक उत्तम ऑफर आणली आहे.

पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने 'पेटीएम मनी'अंतर्गत महाराष्ट्रातील बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना 'यूपीआय'द्वारे पाच लाखांपर्यंत आयपीओ योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा सुरु केली आहे.

इंट्राडेसाठी १० रुपये प्रतिदिन तर एफअँडओ ऑर्डर्ससाठी १० प्रतिदिन अशा सर्वात कमी दरांत ही सेवा आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना पेटीएम आजीवन मोफत डिमॅट अकाउंट देत आहे . प्री ओपन आयपीओ अर्ज देणारे तसेच एलआयसीचे आयपीओ उपलब्ध करवून देणारे पेटीएम हे पहिले व्यासपीठ ठरले आहे.

पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर म्हणाले की, गुंतवणूकदारांना आमच्या सुपर अॅपमुळे झटपट अर्थव्यवस्थापन करता येते. एचएनआयच्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील किरकोळ गुंतवणूकदारांना अधिकाधिक किमतीची गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल.

एलआयसी आयपीओ व एकूणच अर्थव्यवस्थापनासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे, असेही ते पुढे म्हणाले. आजमितीला तब्बल ८.५ लाख ट्रेडींग अकाउंट्स व ९० लाख म्युचुअल फंड गुंतवणूकदार असलेल्या या पोर्टलची प्रगती वाखाणण्याजोगी आहे.

यापैकी जवळजवळ ७५% वापरकर्ते वय वर्ष ३५ पेक्षा कमी वयाचे आहेत. दररोजची उलाढाल ७०,००० कोटी असलेल्या या पोर्टलची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता ११,००० कोटी इतकी आहे. एक लाखांहून जास्त युजर्स असलेले हे पोर्टल एनपीएसच्या डिजीटल वितरकांतील भारतातील पहिल्या तीन पोर्टल्सपैकी एक आहे.

गेल्या वर्षभरातच या पोर्टलद्वारे तब्बल म्युचुअल फंड्समध्ये १ कोटी ६२ लाख तर इक्विटी ऑर्डर्समध्ये ३ कोटी १० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

पेटीएम मनीच्या होम स्क्रिनवरील आयपीओ विभागात जा. प्राधान्यक्रमानुसार गुंतवणूकदारांची श्रेणी निवडा. ५ लाखांपर्यत गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांनी एचएनआय हा पर्याय निवडावा.

जर आपण विमाधारक असाल तर इन्वेस्टर टाईप मधील पॉलिसी होल्डर हा पर्याय निवडा. तुमच्या विम्यास व पेटीएमवरील डिमॅट अकाऊंटशी संलग्न असलेला पॅन क्रमांक एकच असल्याची खात्री करा. तरच आपल्याला पॉलिसी होल्डर हा पर्याय निवडता येईल.

करंट ॲन्ड अपकमिंग' या शिर्षकाखाली आपल्याला एलआयसी आयपीओचा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडताच आपल्याला 'अप्लाय नाऊ' हे बटन दिसेल व ते दाबताच आपण प्रत्यक्ष बिडींग पेजवर जाल. या पेजवर इच्छित किंमत व संख्या टाकावी.

आता 'अॅड युपीआय डिटेल्स' अंतर्गत आपला युपीआय आयडी टाकावा व 'अप्लाय' ह्या बटनावर क्लिक करावे. एकदा आयपीओ चे वितरण झाले की आपणांस त्याचे अपडेट अॅपवर मिळेल.

दरम्यान, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या IPO ला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. LIC IPO ला पहिल्याच फटक्यात मोठे यश मिळाल्याचे म्हटले जात आहे. अँकर गुंतवणूकदारांकडून ५,६२० कोटी रुपयांची पूर्ण सदस्यता प्राप्त झाली आहे.