आता बुकिंगनंतर केवळ ३० मिनिटांत LPG सिलेंडर घरी येणार, ही कंपनी १ फेब्रुवारीपासून सुविधा देणार

By बाळकृष्ण परब | Published: January 13, 2021 04:39 PM2021-01-13T16:39:46+5:302021-01-13T17:22:54+5:30

Tatkal LPG Seva : गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडरसाठी दोन-चार दिवस वाट पाहावी लागणार नाही. तर बुकिंगनंतर अवघ्या ३०-४० मिनिटांमध्ये सिलेंडर तुमच्या घरी येणार आहे.

सर्वसाधारणपणे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर सिलेंडर येण्यासाठी किमान दोन ते चार दिवस वाट पाहावी लागते. मात्र आता गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडरसाठी दोन-चार दिवस वाट पाहावी लागणार नाही. तर बुकिंगनंतर अवघ्या ३०-४० मिनिटांमध्ये सिलेंडर तुमच्या घरी येणार आहे.

सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑयल (IOC) ने एलपीजी तत्काळ सेवा (Tatkal LPG Seva) सुरू करण्याची तयारी केली आहे. आयओसी इंडेन या नावाने गॅस सिलेंडर सेवा देते. त्या माध्यमातून तुम्ही बुकिंग केल्यानंतर केवळ अर्ध्या तासामध्ये गॅस सिलेंडर मिळवू शकाल. सुरुवातीच्या काळात इंडियन ऑइलकडून प्रत्येक राज्यातील एका शहरामध्ये ही सुविधा सुरू होणार आहे.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार आयओसी प्रत्येक राज्यात एक शहर किंवा जिल्ह्याची निवड करेल आणि तिथे या सेवेची सुरुवात करेल. या सेवेंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना ३० ते ४५ मिनिटांमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देईल. सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइलने या योजनेवर काम सुरू असून लवकरच तिला अंतिम रूप देण्यात येईल, असे सांगितले.

या योजनेमुळे आमच्या कंपनीला आमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा वेगळी ओळख मिळेल, असे इंडियन ऑईलने सांगितले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ही सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते. ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयओसी इंडेन या ब्रँडनेमने आपल्या ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध करून देत असते. सध्या देशभरात २८ कोटी एलपीजी ग्राहक असून, त्यापैकी तब्बल १४ कोटी ग्राहक हे इन्डेनचे आहेत.

आयओसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तत्काल एलपीजी सेवा किंवा सिंगल डे डिलिव्हरी सेवेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना काही अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क किती असावे याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. लवकच ग्राहकांना याबाबतची माहिती दिली जाईल.

सध्या ज्या ग्राहकांकडे केवळ एकच सिलेंडर आहे, अशा ग्राहकांना गॅस संपल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागतो. तर ज्यांच्याकडे दोन सिलेंडर असतात, अशा ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे अशा ग्राहकांना फारसा त्रास होत नाही.

Read in English