नवीन कामगार कायदा लवकरच लागू होणार; ऑफिसमध्ये १५ मिनिटंही जास्त काम केल्यास...

By प्रविण मरगळे | Published: February 15, 2021 11:13 AM2021-02-15T11:13:59+5:302021-02-15T11:18:23+5:30

New Labour law: १ एप्रिलपासून ४ नवीन कामगार कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, यात कर्मचारी हिताच्या अनेक बाबींवर कंपनी आणि सरकार मिळून नियमावली लागू करणार आहे.

केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून आगामी आर्थिक वर्षात नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच हा कायदा अंमलात येईल असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. या कायद्याच्या आराखड्यावर अंतिम हात फिरवण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. (New rules for Employee Labour Code)

या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर भारताच्या कामगारवर्गात नव्या नियमांचं युग सुरू होणार आहे असा दावा नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. सरकार नवीन कामगार कायद्यामुळे लोकांमध्ये निर्माण होणाऱ्या शंका आणि प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच हा नवीन कायदा कसा असेल याबाबत अधिक जाणून घेऊया

डिएनए इंडियाच्या रिपोर्टनुसार सरकार नवीन कामगार कायद्यात ओव्हरटाईमची मर्यादा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऑफिसवेळेपेक्षा १५ मिनिटं अधिक काम केल्यास त्याला ओव्हरटाईममध्ये मोजणार आहे

कंपन्यांना यासाठी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त अधिक पैसे द्यावे लागतील. म्हणजे यापूर्वी ही मर्यादा अर्धा तासाची होती, आता ती बदलल्याने ऑफिसची वेळ संपल्यानंतरही १५ मिनिटं अधिक काम केल्यास तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळतील.

कामगार मंत्रालयाने सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या बाजूने हा कायदा तयार केला आहे. यातील सर्व मुद्द्यावर चर्चा करून कायद्याला शेवटचा हात फिरवता येणार आहे. त्यानंतर नवीन नियम लागू होण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती कामगार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

नवीन कामगार कायद्यानुसार कंपन्यांना सर्व कर्मचाऱ्यांना पीएफ आणि ईएसआय सुविधा देणं बंधनकारक असेल. कोणतीही कंपनी ही सुविधा देण्यास नकार देऊ शकत नाही. त्याशिवाय कॉन्टॅक्टवर काम करणाऱ्यांनाही पूर्ण वेतन मिळेल याची खातरजमा कंपनीला करावी लागणार आहे.

नवीन कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्याला ३ सुट्टी दिली जाऊ शकते, त्यासाठी कर्मचाऱ्यांना ४ दिवसीय कामात दिवसाला १२ तास भरावे लागतील, त्यामुळे यापूर्वीप्रमाणे आठवड्याला ४८ तास कामाची मर्यादा नवीन कायद्यात तशीच ठेवण्यात आली आहे.

परंतु सुट्टीची सुविधा ही कंपनी आणि कर्मचारी या दोघांच्या इच्छेवर असेल. जर कर्मचारी दिवसाला १२ तास काम करून आठवड्याचे ४ दिवस भरू इच्छितो तर त्याला कंपनी परवानगी देऊ शकेल. परंतु दिवसाला १२ तास काम करणं सोप्पं नाही त्यासाठी आठवड्याला ४ किंवा ५ दिवस कामकाज करण्यावर कंपनी कर्मचारी हिताचा निर्णय घेऊ शकते.

याशिवाय सरकार असंघटित कामगारांची नोंदणी आणि कल्याणासाठी इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. हे पोर्टल जून महिन्यापर्यंत तयार होऊ शकेल. यात अंसघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी आणि इतर सुविधा पोर्टलवर देण्यात येतील.

पगार-वेतन कोड, औद्योगिक कामगार कोड, सुरक्षा, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा असे ४ कामगार कायदे १ एप्रिल २०२१ पासून लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. सध्या या संदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झालीय अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.