मोदींच्या कार्यकाळात शेअर बाजाराची गरूडझेप; २५ हजारांवरून गाठला ५० हजारांचा टप्पा

By जयदीप दाभोळकर | Published: January 21, 2021 04:47 PM2021-01-21T16:47:17+5:302021-01-21T16:58:43+5:30

शेअर बाजारानं गुरूवारी ऐतिहासिक कामगिरी केली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पहिल्यांदाच ५० हजारांचा टप्पा पार केला. जवळपास ४१ वर्षांपूर्वी १०० निर्देशांक मानत अंकांवर सुरू झालेला शेअर बाजार २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर २५ हजारांवर पोहोचला होता आणि याच कार्यकाळात तो सात वर्षांच्या आत ५० हजारांवर पोहोचला आहे. जाणून घेऊया शेअर बाजाराचा हा प्रवास नक्की कसा होता.

देशात शेअर बाजार आणि त्यांचा व्यवसाय हा पूर्वीपासूनच चालत होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना १८७५ मध्ये करण्यात आली होती. आशियातील हा सर्वात जुना शेअर बाजार आहे. परंतु बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांक सेन्सेक्सची स्थापना १ एप्रिल १९७९ रोजी झाली. तेव्हा याचा निर्देशांक १०० इतका ठरवण्यात आला आणि त्याचं बेस ईयर १९७८-७९ मानलं गेलं.

सेन्सेक्स हे सेन्सिटिव्ह इंडेक्सचा फूल फॉर्म आहे. सेन्सेक्समध्ये ३० दिग्गज आणि सर्वात सक्रिय व्यवसाय करणाऱ्या शेअर्सना ठेवलं जातं. तसंच हे शेअरबाजाराच्या हृदयाचे ठोके असल्याचंही म्हटलं जातं.

१ एप्रिल रोजी स्थापनेनंतर ३ एप्रिल १९७९ रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक १२४.१५ अंकांवर बंद झाला. त्यानंतर २ जानेवारी १९८१ रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक वाढून १५२.२६ अंकांवर बंद झाला. त्यानंतर पहिल्यांदाच १९ जुलै १९८५ रोजी शेअर बाजारानं पहिल्यांदा ५०० अंकाचा टप्पा पार करत निर्देशांक ५०५०.९ अंकांवर बंद झाला.

२५ जुलै १९९० रोजी शेअर बाजार पहिल्यांदा १ हजार अकांवर पोहोचला आणि तो १००७.९७ वर बंद झाला. त्यावर्षी झालेला उत्तम मान्सून आणि कंपन्यांच्या उत्तम निकालांमुळे शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली.

पुढील दोन वर्षांमध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकानं २००० चा आकडा पार केला. १५ जानेवारी १९९२ रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक २०२०.१८ वर बंद झाला. तत्कालिन पंतप्रधान नरसिंम्हा राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या नव्या धोरणांचा फायदा दिसून आला.

१९९९ मध्ये १३ व्या लोकसभेत निवडणुका जिंकून अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं. यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकानं ५ हजारांचा टप्पा पार केला. ११ ऑक्टोबर १९९९ रोजी शेअर बाजाराच्या निर्देशांकानं ५०३१.७८ अंकांचा टप्पा गाठला.

२० जून २००५ मध्ये मुकेश अंबानी आणि त्यांचे बंधू अनिल अंबानी या दोघांमधील प्रकरण मिटल्याच्या चर्चा आल्या. त्यावेळी शेअर बाजारानं पुन्हा जोर पकडला आणि निर्देशांक ७ हजारांच्या वर पोहोचला.

शेअर बाजाराच्या निर्देशांकाला ५ हजारांवरून १० हजारांवर पोहोचण्यासाठी ६ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. ७ फेब्रुवारी २००६ रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक १००८२.२८ वर बंद झाला. पुढील दीड वर्षातच शेअर बाजाराच्या निर्देशांकानं १५ हजारांपर्यंतची झेप घेतली.

१९९२ मध्ये पहिल्यांदा शेअर बाजाराच्या निर्देशांकानं ४ हजार अंकांचा टप्पा गाठला. परंतु त्यानंतर २९०० ते ४९०० अंकांदरम्यानच शेअर बाजार राहिला. परंतु यानंतर हा निर्देशांक ५ हजारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सात वर्षांचा कालावधी लागला. याच वर्षी हर्षद मेहता प्रकरणाचा खुलासा झाल्यानं शेअर बाजार गडगडत गेला आणि शेअर्सची पण मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

९ जुलै २००७ रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक १५०४५.७३ वर बंद झाला. हे वर्ष शेअर बाजारासाठी चांगलंही ठरलं. पुढील सहा महिन्यांमध्ये शेअर बाजारानं २० हजारांचा टप्पा गाठला. डिसेंबर २००७ मध्ये शेअर बाजारानं २० हजार अंकाचा टप्पा पार केला.

८ जानेवारी २००८ रोजी शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पहिल्यांदाच २१ हजारांचा टप्पा पार केला. परंतु कामकाज बंद होण्यापूर्वी तो २१ हजारांच्या खाली गेला. परंतु याच वर्षी आलेल्या आर्थिक मंदीमुळे पुन्हा शेअर बाजारातलं वातावरण बिघडलं. परंतु त्यानंतर शेअर बाजाराला पुन्हा २१ हजारांचा टप्पा गाठण्यासाठी ३ वर्षे लागली.

आर्थिक मंदीचा मोठा फटका आपल्या शेअर बाजारालाही बसला. १० जानेवारी २००८ मध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक १४८८९.२५ अंकांवर बंद झाला. या वर्षी जुलै महिन्यात निर्देशांक १२५७५ अंकांपर्यंत घसरला. इतकंच नाही तर नोव्हेंबर २००८ मध्ये तो ८,४५१.०१ अंकांपर्यंत घसरला.

मार्च २००९ पर्यंत शेअर बाजाराची स्थिती खराबच राहिली. परंतु एप्रिल २००९ मध्ये शेअर बाजाराची स्थिती पुन्हा सुधरताना दिसली. २००९ शेअर बाजार पुन्हा १५ हजारांवर पोहोचला. त्यानंतर सप्टेंबर २०१० मध्ये २० हजारांवर गेला. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये पुन्हा एकदा शेअर बाजार गडगडला आणि ५ ऑक्टोबर २०११ रोजी तो १५७९२,७१ अंकांवर बंद झाला. त्यानंतर त्याला पुन्हा २० हजारांचा टप्पा गाठण्यासाठी २ वर्षे लागली.

१८ जानेवारी २०१३ मध्ये बीएसई सेन्सेक्स पुन्हा २००३९.०४ अंकांवर बंद झाला. परंतु त्याला २५ हजारांवर पोहोचण्यासाठी केवळ दीड वर्ष लागलं. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार सत्तेत आलं.

त्यानंतर पुन्हा एकदा शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. १६ मे २०१४ रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक २५३६४ वर पोहोचला. परंतु कामकाज बंद होईपर्यंत तो पुन्हा २५ हजारांच्या खाली आला. ५ जून २०१४ मध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक २५०१९.५१ वर बंद झाला आणि निर्देशांकाला २५ ते ३० हजारांचा टप्पा पार करण्यासाठी ३ वर्षे लागली.

एप्रिल २०१७ मध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक ३०१३३.३५ वर पोहोचला. इतकंच काय तर पुढील एकाच वर्षात निर्देशांकानं ३५ हजारांचा टप्पाही गाठला. यानंतर ४० हजारांवप पोहोचण्यासाठी शेअर बाजाराला २२ महिन्यांचा कालावधी लागला. ३० ऑक्टोबर २०१९ रोजी शेअर बाजाराच्या निर्देशांकानं ४००५१.८७ अंकांचा टप्पा पार केला.

परंतु २०२० हे वर्ष सर्वांसाठी आव्हानात्मक गेलं. २०२० रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक ४२ हजारांच्या जवळ पोहोचला. परंतु कोरोना विषाणू आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च २०२० मध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक २५९८१.२४ वर येऊन पोहोचला. परंतु एप्रिल महिन्याच्या अखेरिस शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसण्यास सुरूवात झाली.

३० ऑक्टोबर २०१९ रोजी पहिल्यांदाच शेअर बाजाराचा निर्देशांक ४० हजारांच्या वर बंद झाला. परंतु कोरोनाच्या संकटामुळे गुंतवणुकीची अन्य साधनं कमी झाली. तर दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनीही आपल्या शेअर बाजाराकडे मोर्चा वळवला. त्यानंतर काही महिन्यांतच शेअर बाजाराचा निर्देशांक ४० हजारांवरून ४५ हजारांवर पोहोचला. ४ डिसेंबर २०२० रोजी शेअर बाजाराचा निर्देशांक ४५०७९.५५ पर्यंत पोहोचला.

त्यानंतर जवळपास दीड महिन्यातच शेअर बाजाराच्या निर्देशांकानं २१ जानेवारी २०२१ रोजी ५० हजारांचा टप्पा गाठला. परंतु कामकाजाच्या अखेरिस शेअर बाजाराच निर्देशांक ४९६२४.७६ अंकांवर बंद झाला.