Sovereign Gold Bond : मोदी सरकार देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी; पाहा काय आहेत दर आणि महत्त्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 01:50 PM2022-01-10T13:50:33+5:302022-01-10T13:55:48+5:30

Sovereign Gold Bond : तुम्ही स्वस्त सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोदी सरकार तुमच्यासाठी ती संधी घेऊन आले आहे.

Sovereign Gold Bond : तुम्ही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी घेऊन आले आहे.

परंतु हे सोनं तुम्हाला फिजिकल स्वरूपात मिळणार नाही. तुम्हाला १० ते १४ जानेवारी या कालावधीत सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२१-२२ (Sovereign Gold Bond Scheme 2022-21) अंतर्गत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. म्हणजेच मोदी सरकार तुम्हाला पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत ​​आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा एकप्रकारचा सरकारी बॉन्ड असतो जो रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येतो. त्याला डीमॅटच्या रुपात रुपांतरीत केलं जाऊ शकतं. तसंच यात शुद्धतेबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नसते.

गोल्ड बॉन्डची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून प्रकाशित केलेल्या २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीशी लिंक असते. आरबीआयनं सोवरेन बॉन्डसाठी ४७८६ रुपये प्रति ग्रामचा दर निश्चित केला आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल. १ ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला ४,७३६ रुपये मोजावे लागतील. खरेदीसाठी इश्यू किंमत सेबीच्या अधिकृत ब्रोकरला द्यावी लागेल. बाँड विकल्यानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतात.

सोवरेन गोल्ड बॉन्डमध्ये इश्यू प्राईजवर दरवर्षी निश्चितच २.५० टक्क्यांचं व्याज दिलं जातं. हे पैसे सहा महिन्यांमध्ये खात्यात पोहोचतात. परंतु टॅक्स स्लॅबनुसार यासाठी करही द्यावा लागतो.

यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास त्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. हा बॉन्ड सर्व बँक्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, एनएसई आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असतील.

बँकेच्या शाखा, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारेही यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.