गुड न्यूज! स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता 'या' सेवा मिळणार घरपोच; वाचा डिटेल्स

By देवेश फडके | Published: February 15, 2021 12:17 PM2021-02-15T12:17:44+5:302021-02-15T12:23:50+5:30

स्टेट बँकेच्या या नवीन सेवेमुळे (Door Step Banking) हजारो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. वयोवृद्ध व्यक्ती किंवा काही कारणास्तव बँकेच्या शाखेपर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांसाठी बँकेची नवीन योजना अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगितले जात आहे.

स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नवीन (SBI Doorstep Banking) सुविधा आणली आहे. या अंतर्गत बँकेचे ग्राहक घरबसल्या १० हजार रुपयापर्यंतची रक्कम मागवू घरी मागवू शकतात.

स्टेट बँकेच्या 'डोअरस्टेप बँकिंग' या नवीन सुविधेसाठी ग्राहकांना टोल फ्री क्रमांक, मोबाईल अ‌ॅप आणि नेट बँकिंगची मदत घ्यावी लागणार आहे. रोख रक्कम घरपोच देण्यासोबत अन्य बँकिंग व्यवहारही या सुविधेअंतर्गत करता येऊ शकणार आहेत.

स्टेट बँकेने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी 1800 1037 188 आणि 1800 1213 721 हे दोन टोल फ्री क्रमांक दिले आहेत. स्टेट बँकेकडून चेक, ड्राफ्ट, पे ऑर्डर, पिक अप सेवा आणि ड्राफ्ट सेवा या सेवा बँकेकडून पुरवण्यात येणार आहे.

स्टेट बँकेच्या ग्राहकांना याशिवाय गिफ्ट कार्ड, पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट, टीडीएस किंवा फॉर्म १६ सर्टिफिकेट, स्टॅडिंग इन्स्ट्रक्शन रिक्वेस्ट, चेक बुक स्लीप, आयटी चलान, अकाऊंट स्टेटमेंट यांसारख्या सुविधा घरपोच मिळणार आहेत.

स्टेट बँकेच्या ग्राहकांना १० हजारांपर्यंतची रक्कम घरबसल्या मिळणार आहे. तर, २० हजारांपर्यंतची रक्कम काढणे आणि जमा करण्यासाठी मात्र शुल्क द्यावे लागणार आहे. कोणताही आर्थिक व्यवहार केल्यास १०० रुपये तर आर्थिक व्यवहारांशिवाय इतर सेवेचा लाभ घेतल्यास ६० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

स्टेट बँकेच्या ग्राहकांना KYC कागदपत्रे एकत्रित करणे, हयातीचा दाखला जमा करणे, Form 15H जमा करण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येणार आहे. एसबीआयच्या Door Step Banking या सेवेची माहिती अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल.

एसबीआयच्या Door Step Banking या सेवेसाठी काही निकष लावण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक आहे किंवा जे बँकेत जाऊ शकत नाहीत, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांच्या घरापासून ५ कि.मी. अंतरावर स्टेट बँकेची शाखा असणे या सेवेसाठी आवश्यक आहे.

स्टेट बँकेची वेबसाईट www.psbdsb.in वर देखील सेवेसाठी नोंदणी करताय येणार आहे. ग्राहकांच्या बँक खात्याशी त्यांच्या मोबाईल नंबर लिंक करावे लागणार आहेत. संयुक्त खाते, मायनर खाते, व्यावसायिक खाते यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध नसेल.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया ओळखली जाते. स्टेट बँकेचे एकूण खातेदारांची संख्या आताच्या घडीला ४० कोटींच्या घरात आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट देऊन नियम अवश्य वाचा.

स्टेट बँकेच्या या नवीन डोअरस्टेप सेवेमुळे हजारो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. वयोवृद्ध व्यक्ती किंवा काही कारणास्तव बँकेच्या शाखेपर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांसाठी बँकेची नवीन योजना अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगितले जात आहे.

Read in English