टाटांचा हुकूमी एक्का देणार अंबानींना धक्का?; पुढील आठवड्यात धमाका होण्याची शक्यता

By कुणाल गवाणकर | Published: January 10, 2021 07:40 PM2021-01-10T19:40:16+5:302021-01-10T19:43:26+5:30

देशातील दोन बड्या उद्योग समूहांमध्ये सुरू असलेल्या 'भांडवली' संघर्षात पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. टाटा आणि रिलायन्स यांच्यातील शेअर बाजारातील अंतर कमी होत आहे.

टाटा समूहानं दूरदृष्टी दाखवत स्थापन केलेली टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजला धोबीपछाड देण्याची दाट शक्यता आहे.

पुढील काळ माहिती तंत्रज्ञानाचा असेल याचा अचूक अंदाज बांधत टाटा समूहाच्या धुरिणींनी टीसीएसची मुहूर्तमेढ रोवली. टाटा समूहाच्या महसुलात टीसीएसचा वाटा मोठा आहे.

आता टीसीएस भांडवली बाजारमूल्यात मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला धक्का देईल अशी परिस्थिती आहे. कारण सध्याच्या घडीला दोन्ही कंपन्यांच्या भांडवली बाजारमूल्यात अतिशय कमी फरक राहिला आहे.

कोरोना संकटात टीसीएस आणि आरआयएलच्या बाजारमूल्यात वाढ झाली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्सच्या समभागांचे मूल्य घसरताना दिसतं आहे. त्याचा परिणाम बाजारमूल्यात झाला आहे.

रिलायन्सचं बाजारमूल्य घसरत असताना टीसीएसचं बाजारमूल्य वधारलं आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं बाजारमूल्य ३४.२९६.३७ कोटी रुपयांनी कमी झालं. सध्याच्या घडीला कंपनीचं बाजारमूल्य १२,२५,४४५.५९ कोटी इतकं आहे.

गेल्या आठवड्याभरात टीसीएसचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं. मुंबई शेअर बाजारात टीसीएसच्या बाजारमूल्यात ७१,१०२.०७ कोटी रुपयांची वाढ झाली.

सध्याच्या घडीला टीसीएसचं बाजारमूल्य ११,७०,८७५.३६ कोटी रुपये इतकं आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या बाजारमूल्यातील फरक वेगानं कमी होताना दिसत आहे.

जाणकारांच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात टीसीएस रिलायन्सला धोबीपछाड देऊन देशातील क्रमांक एकची कंपनी होऊ शकेल. ८ जानेवारीला टीसीएसनं आर्थिक तिमाहीची आकडेवारी घोषित केले आहेत. या तिमाहीत टीसीएसची कामगिरी उत्तम झाली आहे.

आर्थिक तिमाहीत चांगली कामगिरी झाल्यानं शेअर बाजारातील टीसीएसच्या समभागांचा भाव वधारेल. त्यामुळे टीसीएसचं बाजारमूल्य वाढेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.