देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी! १.१७ कोटींची बोली लावणाऱ्याचं पुढे काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:41 IST2025-12-02T10:34:23+5:302025-12-02T10:41:06+5:30
Fancy Number Plate : गेल्या आठवड्यात देशभरात चर्चेचा विषय ठरलेली HR 88 B 8888 ही फॅन्सी नंबर प्लेट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हीआयपी नंबर प्लेटसाठी १.१७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावणाऱ्या व्यक्तीने वेळेत पैसे न भरल्यामुळे, हा नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस 'रोमुलस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड'चे संचालक सुधीर कुमार यांनी ही बोली लावली होती. ही बोली भारताच्या इतिहासातील कोणत्याही नंबर प्लेटसाठी लावलेली सर्वात मोठी बोली होती. १.१७ कोटी रुपये भरण्याची अंतिम मुदत आज, १ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत होती.

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, सुधीर कुमार यांनी रविवारी सांगितले की, त्यांनी शनिवारी रात्री दोनदा बोलीची रक्कम जमा करण्याचा प्रयत्न केला, पण तांत्रिक बिघाडामुळे पेमेंट होऊ शकले नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या कुटुंबाने या नंबर प्लेटवर १.१७ कोटी रुपये खर्च करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. "कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे आहे की, केवळ एका नंबर प्लेटवर इतकी मोठी रक्कम खर्च करणे हा शहाणपणाचा निर्णय नाही," असे सुधीर कुमार यांनी सांगितले.

सुधीर कुमार म्हणाले की, त्यांनी सोमवारपर्यंत कुटुंबाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यामुळे हा विक्रमी बोलीचा नंबर आता पुन्हा लिलावात जाणार हे निश्चित झाले आहे.

या प्रीमियम नंबरची ऑनलाइन लिलावाची सुरुवात ५०,००० रुपयांच्या बेस प्राइसपासून झाली होती. बुधवार दुपारपर्यंत बोली ८८ लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती, तर संध्याकाळी ५ वाजता १.१७ कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह लिलाव बंद झाला.

या नंबरसाठी एकूण ४५ अर्जदारांनी बोली लावली होती. हरियाणामध्ये व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर प्लेट्सचा ऑनलाइन लिलाव fancy.parivahan.gov.in या वेबसाइटद्वारे साप्ताहिक तत्त्वावर चालवला जातो.

















