मस्तच! आता मुंबई, बंगळुरु, दिल्लीकडे रोजगार निर्मितीचे नेतृत्व; ‘या’क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:32 PM2021-07-23T12:32:05+5:302021-07-23T12:36:58+5:30

jobs: रोजगार निर्मितीच्या बाबतीत बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद यासारखी मेट्रो शहरे नेतृत्वस्थानी येण्यास सिद्ध झाल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

शहरांतील रोजगार निर्मितीच्या बाबतीत बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद यासारखी मेट्रो शहरे नेतृत्वस्थानी येण्यास सिद्ध झाल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. ‘टीमलीज सर्व्हिसेस’ या भरती संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

अहवालानुसार, कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेतून आता अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. विक्री आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढली आहे. व्यवसाय सातत्य आणि वृद्धी याकडे कंपन्यांचे लक्ष आहे. गुणवत्तापूर्ण नोकरभरतीत वाढ अपेक्षित आहे.

टीमलीजच्या उपाध्यक्ष ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता ही मेट्रो शहरे रोजगार निर्मितीचे नेतृत्व करतील, असे दिसून येत आहे.

या शहरांत रोजगार निर्मिती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, तेथील सर्वाधिक प्रमाणात झालेले लसीकरण हे होय. वार्षिक रोजगार कल सर्वेक्षणानुसार, आयटी, ई-कॉमर्स, आरोग्य आणि एडटेक ही क्षेत्रे कोरोना साथीच्या प्रतिकूल परिणामांपासून सुरक्षित राहिली आहेत.

बँकिंग, वित्त व विमा, दूरसंचार, वस्तू उत्पादन आणि अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रे जलदगतीने सुधारताना दिसत आहेत. याउलट एफएमसीजी आणि टिकाऊ ग्राहकवस्तू या क्षेत्रांना सुधारण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात.

किरकोळ विक्री, जीवनशैली आणि आतिथ्य या क्षेत्रांत मात्र सुधारणा होण्यास दीर्घ काळ लागू शकतो. मे २०२१ मध्ये नव्या रोजगाराचा आकडा घसरून ५,७२,६३४ झाला आहे. हा जून २०२० नंतरचा नीचांक ठरला आहे.

कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे ही घसरण झाल्याचे कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) म्हटले आहे. एप्रिलमध्ये ७,४१,२७० नवीन ईपीएफ सदस्य झाले होते. मेमध्ये हा आकडा घसरून ५,७२,६३४ इतका झाला.

याचाच अर्थ मेमध्ये त्यात तब्बल १,६८,६३६ इतकी घसरण झाली, असे ईपीएफओने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. ईपीएफओ सदस्यत्वाच्या आधारे देशातील रोजगाराची आकडेवारी (पे रोल नंबर्स) ठरविली जाते.

मार्चमध्ये ७,१६,२२३ नवीन कामगार औपचारिक श्रमशक्तीत दाखल झाले होते. फेब्रुवारीत हा आकडा ८,०७,४८२, तर जानेवारीत ८,८३,३९२ होता, असे ईपीएफओ अहवालावरून दिसते.

मे २०२१ पेक्षा सर्वांत कमी नवीन रोजगार जून २०२० मध्ये निर्माण झाले होते. त्या महिन्यात ५,७७,८३२ नवीन ईपीएफओ सदस्य झाले होते. त्यावेळी कोरोना साथीच्या पहिल्या लाटेचा शिखर काळ होता. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, मेमध्ये १८ ते २५ वयोगटातील लोकांच्या रोजगारात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून आले.

या वयोगटातील ३,९३,०३१ नवे कामगार एप्रिलमध्ये ईपीएफओचे सदस्य झाले होते. मेमध्ये हा आकडा ८९ हजारांनी घसरून ३,०४,६२६ वर आला. रोजगार मिळविण्यात तरुणांना अधिक अवघड झाले असल्याचे यावरून दिसते.