सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 06:47 IST2025-12-09T06:43:29+5:302025-12-09T06:47:27+5:30

चांदीने दिले ८५% रिटर्न्स, विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला; सततच्या महागाईच्या चिंतेने सोने चकाकले

गुंतवणुकीतील सर्व पर्याय फिके पडत असताना सोन्याने २०२५ मध्ये आपल्या नावाला शोभणारी सोनेरी कामगिरी कायम ठेवली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे प्रमुख साधन म्हणून सोन्याची चमक अधिक उजळली असून, यावर्षी देशांतर्गत बाजारात त्याने तब्बल ६७ टक्के परतावा (रिटर्न) दिला आहे.

जागतिक परिस्थिती आणि रुपया-डॉलरचा दर कमकुवत झाला तर २०२६ मध्ये सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम आणखी ५ ते १६ टक्क्यांनी वाढू शकतात. सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकाच्या जवळ असल्याने, शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले.

१ जानेवारी २०२५ रोजी १० ग्रॅम सोन्याचा दर ७९,३९० होता; तो ५ डिसेंबरला १,३२,९०० रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने यावर्षी सुमारे ६० टक्के उसळी घेतली आहे.

यावर्षी सोन्याने मजबूत परतावा दिला आहे. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती यावर्षी आतापर्यंत जवळजवळ ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारतात परतावा आणखी जास्त आहे.

यावर्षी आतापर्यंत देशांतर्गत सोन्याच्या किमती जवळजवळ ६७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोने हे इक्विटी आणि बाँडपेक्षा यावर्षी अधिक चांगलं गुंतवणूक साधन ठरले आहे.

जागतिक परिस्थिती, रुपया-डॉलर दर कमकुवत झाले, तर सोन्याची किंमत १.४५ लाख ते १.५५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी म्हटले.

कशामुळे वाढली सोन्याची चमक? : जागतिक आर्थिक अस्थिरता I भू-राजकीय तणाव वाढ I सुरक्षित गुंतवणुकीकडे कल I प्रमुख देशांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी I रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर I व्याजदर कपातीची अपेक्षा

कुणी दिले अधिक रिटर्न्स? ८५% चांदी, ६७% सोने, १०% निफ्टी बँक ६.७% निफ्टी ५० टोटल रिटर्न इंडेक्स. महागाई आणि जागतिक अनिश्चिततेपासून सोन्यात गुंतवणूक करणे हा एकमेव गुंतवणूक पर्याय म्हणून नव्हे.