Elon Musk : एलॉन मस्क यांना मोठा झटका, ट्विटरवर लोकांचा सल्ला घेणं पडलं महागात; ५० अब्ज डॉलर्स बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 08:29 PM2021-11-10T20:29:56+5:302021-11-10T20:33:46+5:30

Elon Musk Tesla Electric Vehicle Shares : दोन दिवसांत एलॉन मस्क यांना लागला ५० अब्ज डॉलर्सचा फटका.

Elon Musk Tesla Electric Vehicle Shares : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रीक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांना मोठा झटका बसला आहे. अवघ्या दोन दिवसांत त्यांचे ५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही अब्जाधीशांना दोन दिवसांत इतके मोठे नुकसान सोसावे लागले नव्हते. २०१९ मध्ये एका दिवशी जेफ बेझोस यांना ३६ अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले होते. ते आणि त्यांच्या पत्नीनं विभक्त होण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर त्यांना हा फटका बसला होता.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रीक कार चं उत्पादन करणआरी कंपनी टेस्लाचे मालक (Electric Vehicle Tesla Owner) यांनी एक ट्वीट करत सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला होता. आपले टेस्लाचे १० टक्के शेअर्स विकावेत का याबाबत त्यांनी ट्विटरवर आपल्या फोलोअर्सकडे सल्ला मागितला होता. त्यांचं हे ट्विट अशावेळी आलं, जेव्हा अमेरिकेत डेमोक्रॅट्सकडून बिलेनियर टॅक्सचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

'अलीकडे कर टाळण्यामुळे खूप अवास्तव फायदा झाला आहे. म्हणून मी टेस्लाचे १० टक्के शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवतो,' असं एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं होतं. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी हे ट्वीट करण्यापूर्वीच त्यांच्या भावानं हे शेअर्स विकले असल्याचं म्हटलं होतं.

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतरही टेस्लाचं मार्केट कॅप १ ट्रिलिअन डॉलर्सच्या वर राहिलं आहे. या वर्षी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या नंतर Amazon चे सीईओ जेफ बेझोस यांचा क्रमांक येतो.

वेडबश सिक्युरिटीजचे विश्लेषक डॅनिअल इवेस यांनी दिलेल्या माहितीनुसार मस्क यांच्याकडे टेस्लाचे जवळपास २३ टक्के शेअर्स आहेत. त्यांच्याकडे टेस्लाच्या रूपातच सर्वाधिक संपत्ती आहे. टेस्ला त्यांना वेतन देत नाही.

"ना मी कुठून बोनस घेतो ना मला कोणता पगार मिळतो. अशातच कराची रक्कम देण्यासाठी माझ्याकडे टेस्लाचे शेअर्स विकण्याचाच पर्याय उपलब्ध आहे. जो काही याचा परिणाम होईल तो स्वीकारला जाईल," असंही मस्क यांनी यापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये नमूद केलं होतं. दरम्यान, त्यांच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. तसंच बहुतांश लोकांनी त्यांना १० टक्के शेअर्स विकण्याचा सल्ला दिला होता.

३० जून २०२१ पर्यंत एलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाचे १७०.५ मिलियन शेअर्स होते. जर त्यांनी ते शेअर्स विकले तर शुक्रवार पर्यंत त्या शेअर्सची किंमत २१ बिलियन डॉलर्स इतकी होती असं वृत्तसंस्था रॉयटर्सनं म्हटलं आहे.

मस्क यांचं ट्वीट अशा वेळी समोर आलं आहे, जेव्हा युएस काँग्रेसकडून बिलेनियर टॅक्सचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या टॅक्सचा वापर बायडेन सरकार सोशल आणि क्लायमेट चेंजशी निगडीत गोष्टी पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. मस्क यांनी यापूर्वीही या टॅक्सवर टीका केली होती.