LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 12:11 PM2021-11-20T12:11:08+5:302021-11-20T12:15:59+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या LIC च्या IPO बाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या LIC च्या IPO बाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दीपम सचिव तुहिन पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, LIC चे मूल्यांकन पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जर सर्व काही वेळेवर झाले, तर LIC चा IPO चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्च दरम्यान येईल. सरकारला LIC मधील १० टक्के हिस्सा विकायचा आहे आणि त्याद्वारे १ लाख कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे.

सरकारने LIC मधील ५ टक्के हिस्सेदारी विकली, तर हा IPO सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा होईल, जो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असेल. १० टक्के हिस्सेदारी विकल्यानंतर हा सुमारे १ लाख कोटी रुपयांचा आयपीओ असेल.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हा आयपीओ जगातील कोणत्याही विमा कंपनीने जारी केलेल्या आयपीओमध्ये दुसरा असेल. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणूक आणि खाजगीकरणासाठी १.७५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, एलआयसी आयपीओ आणि बीपीसीएल (BPCL)ची निर्गुंतवणूक खूप महत्वाची आहे.

सरकारने चालू आर्थिक वर्षात ५-६ सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची तयारी केली आहे. अशा स्थितीत डिसेंबर-जानेवारीपर्यंत अनेक कंपन्यांसाठी आर्थिक बोलीची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा आहे, असे पांडे यांनी म्हटले आहे. मात्र, यामुळे शेअर मार्केटवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

या आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्गुंतवणुकीतून केवळ ९३३० कोटी रुपये जमा झाले आहेत. टाटा समूहाची कंपनी टालेस प्रायव्हेट लिमिटेडला एअर इंडिया विकण्यास सरकारने गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती. त्या बदल्यात, सरकारला २७०० कोटी रुपये मिळाले आणि टॅलेसने एअरलाइनवर १५,३०० कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा उचलला.

सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची कमान टाटा समूहाकडे सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशाही पांडे यांनी व्यक्त केली. एअर इंडियाच्या विक्रीनंतर सार्वजनिक युनिट्सच्या खाजगीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण केली जाऊ शकते.

यासाठी खासगी क्षेत्राचे सहकार्यही आवश्यक असल्याचे डीआयपीएएम सचिव पांडे यांनी सांगितले. जेव्हा सार्वजनिक उपक्रमांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा खासगी क्षेत्रालाही बोली लावून आपली भूमिका बजावावी लागते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, LIC च्या IPO साठी सरकारने गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती केली होती. नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड एलआयसीच्या या आयपीओचे व्यवस्थापन करण्यासाठी १० मर्चंट बँकर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.