coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:08 PM2020-05-05T20:08:21+5:302020-05-05T20:30:34+5:30

कोरोना विषाणूचा वेगाने होत असलेला फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार संकटात सापडला आहे.

कोरोना विषाणूचा वेगाने होत असलेला फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार संकटात सापडला आहे. तसेच अनेक कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे.

अशा परिस्थितीत तुम्हालाही रोजगाराची समस्या भेडसावत असेल तर तुम्हाला काहीसा दिलासा देणारी ही बातमी आहे. बेरोजगारीचे संकट असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी एक योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेंतर्गत बेरोजगार होण्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्याला २४ महिन्यांपर्यंत पैसे मिळतील. या संदर्भातील वृत्त आज तकने प्रकाशित केले आहे.

बेरोजगारीचा सामना करणाऱ्यांसाठी मदत म्हणून केंद्र सरकारने आणलेल्या या योजनेचे नाव ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजना असे आहे. या योजनेंतर्गत नोकरी गेल्यास केंद्र सरकार तुम्हाला दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत करेल.

ही मदत दर महिन्याला मिळेल. बेरोजगार व्यक्तीला त्याच्या ९० दिवसांच्या सरासरी पगाराच्या २५ टक्के रकमेएवढी मदत दिली जाईल.

मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटीशर्थी लागू आहेत. या योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातील त्याच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ज्यांची ईएसआयसीमध्ये नोंदणी आहे. तसेच दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून नोकरी करत आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांचा बँक खाते आधार कार्डला जोडलेले असले पाहिजे.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी ईएसआयसीच्या वेबसाईटवर जाऊन अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेमध्ये नोंदणी करावी लागेल.

या योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या संकेत स्थळा वर क्लीक करा

मात्र गैरवर्तनामुळे कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच गुन्हा नोंद असलेल्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.