भन्नाट योजना! कर्मचाऱ्यांना आठवड्याला ३ सुट्ट्या अन् ४ दिवसच काम; ‘या’ कंपनीने सुरु केली चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 01:57 PM2022-01-18T13:57:29+5:302022-01-18T14:10:00+5:30

जपान आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक ठिकाणी अशा प्रकारची योजना कंपन्यांकडून राबवली जात आहे. पाहा, डिटेल्स...

कोरोना कालावधीपासून अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले आहे. अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम पुढेही सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. तर काही कंपन्यांनी आता आठवड्यातील ४ दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी असेही सूत्र तयार केले आहे.

कोरोना संकट काळात काही कंपन्यांनी हायब्रीड योजनेवर भर दिला आहे. यात काही दिवस ऑफिसमध्ये काम आणि काही दिवस घरातून काम अशी योजना राबवण्यात आली आहे. मात्र, एका बड्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भन्नाट योजना आणली आहे.

कॅमेरा उत्पादक कंपनी कॅननच्या ब्रिटीश शाखेने हा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ३ दिवसांची साप्ताहिक सुट्टी देण्याची तयारी सुरू केली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त ४ दिवस काम करावे लागणार आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयानंतरही कर्मचाऱ्यांचा पगार पूर्वीसारखाच राहणार आहे. सध्या कंपनी ट्रायल रन म्हणून त्याची अंमलबजावणी करणार आहे. केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या सहकार्याने हा पायलट प्रोजेक्ट केला जात आहे.

या पायलट प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत सुमारे ६ कंपन्या सहभागी झाल्या आहेत. ही चाचणी जून महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी २०-३० कंपन्या यात सामील होतील, अशी संशोधकांची अपेक्षा आहे.

एडिनबर्ग येथील कॅनन मेडिकल रिसर्च युरोप कंपनीत सुमारे १४० कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्यावर ३ साप्ताहिक सुट्ट्यांची चाचणी केली जाणार आहे. ही कंपनी वैद्यकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सॉफ्टवेअर बनवते आणि तिची मूळ कंपनी जपानच्या निक्केई (Nikkei) २२५ इंडेक्समध्ये सूचीबद्ध आहे.

दरम्यान, जपानमधील लोक हे जगातील सर्वात जास्त काम करणारे लोक मानले जातात, पण वीकऑफ देखील तिथेच सर्वाधिक मिळतात. जपानमध्ये कर्मचाऱ्यांना फक्त ४ दिवस काम करावे लागते, तर त्यांना ३ दिवस आठवड्याची सुट्टी मिळते.

जास्त काम केल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या जपानमधून वारंवार येत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन तेथील सरकारने वर्क लाइफ संतुलित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी दुबईने अडीच दिवसांची वीकऑफ संस्कृती स्वीकारली. आता आणखी एक कंपनी ३ दिवसांचा वीकऑफ देणार आहे, अशी चर्चा आहे. जगात अशा अनेक कंपन्या आणि देश आहेत, जिथे ३ दिवस वीकऑफची संस्कृती आहे.

संयुक्त अरब अमिरातीने ७ डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून साडेचार दिवस काम करावे लागेल आणि त्यांना अडीच दिवसांची सुट्टी मिळेल, असे जाहीर केले.

अडीच दिवसांची सुट्टी १ जानेवारी २०२२ पासून लागू झाली असून कर्मचाऱ्यांचा वीकेंड शुक्रवार दुपारपासून सुरू होईल आणि शनिवार-रविवारपर्यंत चालेल. अधिकृत निवेदनानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार असून त्यानंतर कर्मचारी शुक्रवारची नमाज अदा करू शकतील.

२०१५ ते २०१९ दरम्यान आइसलँडने कमी तास काम करूनही मजुरी कमी न करण्याचा प्रयोग केला आहे. त्याअंतर्गत आठवड्यात ४० ऐवजी ३५-३६ तास काम केले जात होते.

अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांचे कामाचे तास कमी केल्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी चार दिवसात ३५-३६ तासांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम करू लागले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. स्पेन आणि न्यूझीलंड देखील वेळोवेळी कमी तासांच्या प्रणालीचा वापर करतात.