Mukesh Ambani Vs Gautam Adani: पलट गई बाजी! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:44 PM2022-01-25T17:44:12+5:302022-01-25T17:56:48+5:30

आज, म्हणजेच 25 जानेवारी 2022 रोजी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मंदीची स्थिती आहे. यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. परिणामी मुकेश अंबानींच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे.

आज, म्हणजेच 25 जानेवारी 2022 रोजी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अशा प्रकारे अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ डेटानुसार, गौतम अदानी यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर (रु. 6.72 लाख कोटी) एवढी आहे. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 89.8 अब्ज डॉलर (6.71 लाख कोटी रुपये) एवढी आहे. या आकडेवारीनुसार कमाईच्या बाबतीत अदानी जगात 11व्या क्रमांकावर आहे.

दोन दिवसांत किती आपटले रिलायन्सचे शेअर्स? - बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) आकडेवारीवर नजर टाकल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स दोन दिवसांत 155 रुपयांनी घसरले. बातमी लिहिण्याच्या काही वेळ आधी, रिलायन्सचे शेअर्स 2.29 टक्क्यांनी घसरून 2323.05 रुपयांवर ट्रेंड करत होते. रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 200 रुपयांची घसरण झाली आहे.

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, दोन दिवसांत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर म्हणजेच 52,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

दिवसाला 6000 कोटींनी वाढतेय अदानींची संपत्ती - फोर्ब्सच्या रिअल-टाइम डेटानुसार, 31 डिसेंबर रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 78 अब्ज डॉलर (5.82 लाख कोटी रुपये) होती. जी 18 जानेवारी 2022 रोजी वाढून 93 अब्ज डॉलर (6.95 लाख कोटी रुपये) झाली. यावेळी म्हणजे 25 जानेवारी रोजी अदानींची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर (6.72 लाख कोटी रुपये) आहे. यानुसार, नवीन वर्षात गौतम अदानी यांची एकूण संपत्ती रोज 6,000 कोटींहून अधिकने वाढत आहे.

अदानींच्या स्टॅक्समध्ये सातत्याने तेजी - अदानी समूहाच्या एकूण 6 कंपन्या भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या वर्षी जानेवारीमध्येच या सर्व कंपन्यांमध्ये 5% ते 45% पर्यंत परतावा मिळाला आहे.

विशेषतः समूहाच्या एनर्जी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली आहे. यातही अदानी ग्रीन एनर्जीने 45% पेक्षाही अधिकची वाढ नोंदविली आहे.

याशिवाय, अदानी ट्रांसमिशन आणि अदानी पावरमध्येही गुंतवणूकदारांना कमी कालावधीत अधिक परतावा मिळाला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी...!