EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 15:30 IST2025-12-07T15:23:37+5:302025-12-07T15:30:06+5:30

Banks Cut Loan Interest Rates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्केची कपात केली. या निर्णयामुळे रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे, ज्यामुळे घर आणि वाहन कर्ज घेणाऱ्या सामान्य ग्राहकांना मोठी आर्थिक मदत मिळाली आहे.

रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात निधी मिळतो. यामुळे बँकांची निधीची किंमत कमी होते आणि याचा थेट फायदा बँका ग्राहकांना कर्जाचे व्याजदर कमी करून देतात. यामुळे EMI चा भार कमी होतो.

आरबीआयच्या घोषणेनंतर लगेचच बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि करूर वैश्य बँक या चार प्रमुख बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजदर कमी करण्याची तातडीने घोषणा केली. यामुळे इतर बँकांवरही दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे.

बँक ऑफ बडोदाने आपले व्याजदर ८.१५% वरून ७.९०% पर्यंत, तर इंडियन बँकेने ८.२०% वरून ७.९५% पर्यंत कमी केले आहेत. या दोन्ही बँकांचे नवे आणि स्वस्त दर ६ डिसेंबर २०२५ पासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ इंडियाने आपला व्याजदर कमी करून ८.१०% केला आहे, जो ५ डिसेंबर पासून प्रभावी आहे. त्याचप्रमाणे, करूर वैश्य बँकेनेही आपले दर कमी करून ८.५५% केले आहेत. या निर्णयामुळे या बँकांचे ग्राहक स्वस्त दरात कर्जाचा लाभ घेऊ शकतील.

चालू वर्षात (२०२५) कर्ज घेणाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण फेब्रुवारी, एप्रिल आणि जूननंतर डिसेंबरमध्ये केलेली ही चौथी व्याजदर कपात आहे. यामुळे वर्षाच्या सुरुवातीला असलेला ६.५०% रेपो रेट आता ५.२५% पर्यंत खाली आला आहे.

रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे फ्लोटिंग रेट कर्जाचे व्याजदर थेट कमी होतात. याचा अर्थ गृह कर्ज, ऑटो लोन आणि पर्सनल लोन घेणाऱ्यांची मासिक EMI कमी होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात बचत होईल.

ज्या ग्राहकांनी अद्याप कर्ज घेतलेले नाही. परंतु, भविष्यात घर खरेदी किंवा वाहन कर्जाचे नियोजन करत आहेत, त्यांच्यासाठीही ही मोठी संधी आहे. कमी झालेले व्याजदर भविष्यातील कर्जाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करतील आणि कर्ज घेण्याची क्षमता वाढवतील.