Bank overdraft facility: कामाची गोष्ट! बँक खात्यात बॅलन्स नसतानाही मिळते रक्कम; पाहा कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:24 PM2022-01-14T13:24:03+5:302022-01-14T13:36:36+5:30

Bank Overdraft Facility : कोणाहीकडे पैसे मागण्यापूर्वी आपल्याला बँक देत असलेल्या या सुविधेचा नक्की विचार करा.

Bank overdraft facility: अनेकवेळा असं घडतं जेव्हा आपल्याला पैशांची नितांत गरज असते पण बचतीच्या (Savings) नावाखाली आपल्याकडे काहीच नसतं. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागतात. तुम्हीही अशा परिस्थितीत अडकले असाल तर घाबरण्याची गरज नाही. कोणाहीकडे पैसे मागण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.

आम्ही तुम्हाला बँकेच्या अशाच सेवेबद्दल सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गरज पडेल तेव्हा पैसे मिळवू शकता. वाईट काळात बँकांनी दिलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा तुम्ही घेऊ शकता. बँकांची ओव्हरड्राफ्ट (Overdraft) सुविधा ही कर्ज घेण्यासारखीच आहे, परंतु यासाठी तुम्हाला हप्त्यांमध्ये नव्हे तर एकरकमी रक्कम भरावी लागेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ओव्हरड्राफ्ट ही एक आर्थिक सुविधा आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात (Bank Account) पैसे नसतानाही त्यातून पैसे काढू शकता. प्रत्येक ग्राहकासाठी ओव्हरड्राफ्ट मर्यादा निश्चित केली जाते, जी बँकेशी असलेल्या तुमच्या संबंधांवर अवलंबून असते.

ग्राहक विहित मर्यादेपर्यंतच पैसे काढू शकतो. ओव्हरड्राफ्ट म्हणून काढलेल्या पैशावर बँक व्याज आकारते. जन धन योजनेंतर्गत तुमच्या खात्यात बॅलन्स नसला तरी १० हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध असेल.

खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे ऑफर केलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेवरील व्याज दर अर्जदारानुसार बदलतो आणि कर्जाची आवश्यक रक्कम, परतफेडीचा कालावधी आणि संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी असलेल्या संबंधांवर अवलंबून असतो.

बँक ओव्हरड्राफ्ट ही सुविधा कर्जापेक्षा खूप वेगळी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट आणि बँक लोनमधील सर्वात मोठा फरक म्हणजे ओव्हरड्राफ्टमध्ये व्याज दर फक्त वापरलेल्या रकमेवरच दिला जातो, तर बँक कर्जामध्ये, तुम्हाला संपूर्ण रकमेवर व्याजदर भरावा लागतो.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल किंवा ऑनलाइन अर्ज करावा लागेल. बर्‍याच बँका ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी आकारलेल्या एकूण रकमेच्या १ टक्के प्रक्रिया शुल्क आकारतात. बँक ही सुविधा काही लोकांना आपोआप पुरवते, तर काही ग्राहकांना त्यासाठी अर्ज करावा लागतो.

ओव्हरड्राफ्ट ही एक अशी सुविधा आहे ज्याचा लाभ कोणतंही बँक खाते सांभाळून घेता येतो. आता अनेक खाजगी बँका पगार खाते आणि बचत खातेधारकांना ही सुविधा देत आहेत. तुम्हाला मिळणारी ओव्हरड्राफ्ट मर्यादा खात्याची हिस्ट्री, पेमेंट रेकॉर्ड किंवा क्रेडिट स्कोअरवर आधारित आहे.

हे बँकेद्वारे प्रदान केलेले अल्प-मुदतीचे कर्ज म्हणून देखील मानले जाऊ शकते. ज्याची एका विहित वेळेत परतफेड करणे आवश्यक आहे. या कर्जावर किंवा ओव्हरड्राफ्टवर व्याज आकारले जाते. हा परतफेड कालावधी बँकेने निश्चित केला आहे आणि बँकेला त्याचे खाते वापरण्याचे पूर्ण अधिकार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, करंट अकाऊंट आणि कॅश क्रेडिट अकाऊंट जास्तीत जास्त ५० हजार रुपये दर आठवड्याला ओव्हरड्राफ्टसाठी पात्र आहेत. तथापि, ही मर्यादा पर्सनल ओव्हरड्राफ्ट खात्यावर लागू होत नाही.