BPCL सह ‘या’ सरकारी कंपन्यांवर वेदांता ग्रुपची नजर; १० अब्ज डॉलरचा निधी उभारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:37 PM2022-01-21T13:37:57+5:302022-01-21T13:45:35+5:30

केंद्रातील मोदी सरकार BPCL मधील संपूर्ण ५३ टक्के स्टेक विकण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याची किंमत सुमारे ६ अब्ज डॉलर आहे.

चालु आर्थिक वर्षात सरकारी कंपन्यांचे खासगीकरण किंवा चलनीकरण करून लाखो कोटी रुपये उभारण्याचा मानस केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बोलून दाखवला होता. यातील एअर इंडियाचे खासगीकरण यशस्वी झाले. मात्र, इतर अनेक कंपन्या आहेत, ज्या या यादीत आहेत.

सरकारी कंपनी असलेल्या BPCL च्या खासगीकरणाची चर्चाही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, प्रक्रिया पुढे सरकत नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, अनिल अग्रवाल यांची खाण कंपनी वेदांता रिसोर्सेस लिमिटेडची नजर बीपीसीएल आणि इतर सरकारी कंपन्यांकडे लागली आहे आणि त्यासाठी १० अब्ज डॉलर्सचा निधी गोळा केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

अनिल अग्रवाल यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात माहिती मिळाली आहे. केंद्रातील मोदी सरकार BPCL मधील संपूर्ण ५३ टक्के स्टेक विकण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याची किंमत सुमारे ६ अब्ज डॉलर आहे.

कंपनी १० अब्ज डॉलर्सचा निधी तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. कंपनीची नजर फक्त बीपीसीएलवरच नाही, तर ज्या सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण होणार आहे, त्या कंपन्यांवरही आहे. कंपनी स्वतःची संसाधने आणि बाह्य गुंतवणुकीतून हा निधी तयार करत आहे.

बीपीसीएल विकत घेण्यासाठी कंपनी कर्ज देखील घेऊ शकते. सर्व मोठ्या फंडांना आमच्यात सामील व्हायचे आहे, त्यामुळे पैशाची कोणतीही अडचण येणार नाही, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

वेदांताचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. २००३ मध्ये अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या कंपनीची वार्षिक कमाई गेल्या दशकात १० लाख डॉलरवरून १५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. भारताशिवाय दक्षिण आफ्रिकेतही कंपनीचा खाण व्यवसाय आहे.

तसेच युएईच्या फुजैराह फ्री झोनमध्ये (Fujairah Free Zone) कंपनीचा प्लांट आहे. याशिवाय कंपनी सौदी अरेबियामध्ये जस्त, सोने आणि मॅग्नेशियमच्या खाणींच्या शक्यतांचाही शोध घेत आहे. त्यासाठी २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे, असे अग्रवाल म्हणाले.

सरकारला अपेक्षा आहे की, बीपीसीएलच्या व्यवहाराला उच्च मूल्यमापन मिळेल. एस्सार ऑइल डीलमध्ये रिफायनरी, कॅप्टिव्ह पोर्ट, पॉवर प्लांट आणि ३,५०० पेट्रोल पंप समाविष्ट होते.

त्या तुलनेत, बीपीसीएलच्या डीलमध्ये मुंबई आणि कोचीमधील सुमारे १९ हजार पेट्रोल पंप, ६० विमान इंधन केंद्रे, एलपीजी बॉटलिंग प्लांट, रिफायनिंगची क्षमता असलेला प्रकल्प यांचा समावेश आहे. एवढेच नाही, तर पेट्रोकेमिकल प्लांट आणि सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनमधील भागिदारीसह २० अब्ज डॉलरच्या मोझांबिक एलएनजी प्रकल्पातील १० टक्के स्टेक देखील समाविष्ट आहे.