Airtel युजर्संना झटका! प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 09:56 AM2021-11-22T09:56:55+5:302021-11-22T10:06:51+5:30

Airtel Prepaid Plans : कंपनीने टॅरिफ दरात 25 टक्के वाढ केली आहे. याआधी जुलैमध्ये कंपनीने पोस्टपेड प्लानच्या किंमतीतही वाढ केली होती.

मोबाइल सेवा प्रदाता कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel)आपल्या प्रीपेड प्लॅन्सवरील दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. एअरटेलने प्रीपेड प्लॅनवर टॅरिफ दर 25 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. एअरटेलने जाहीर केलेले नवीन टॅरिफ दर 26 नोव्हेंबरपासून लागू होतील.

एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना महागाईचा झटका बसणार आहे. कंपनीने टॅरिफ दरात 25 टक्के वाढ केली आहे. याआधी जुलैमध्ये कंपनीने पोस्टपेड प्लानच्या किंमतीतही वाढ केली होती.

आता एअरटेलच्या 28 दिवसांच्या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 99 रुपयांपासून सुरू होईल. म्हणजेच या प्लॅनमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने जुलैमध्ये 49 रुपयांचा प्लॅन काढून टाकला होता. दरम्यान, हा प्लॅन एसएमएससह येत नाही.

जर तुम्हाला एसएमएस (SMS) देखील हवे असेल तर तुम्हाला 149 रुपयांसाठी 179 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. या बेनिफिट आणि 1GB डेटासह 219 रुपयांचा प्लॅन देखील येत होता. आता त्याची किंमत 265 रुपयांवर गेली आहे.

एअरटेलच्या 598 रुपयांच्या लोकप्रिय प्लॅनची ​​किंमतही वाढवण्यात आली आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये रोजच्या युजर्संना 1.5GB डेटा दिला जातो. आता या प्लॅनसाठी तुम्हाला 719 रुपये खर्च करावे लागतील. डेटा टॉपअप आणि इतर योजनांच्या दरात 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.

या प्रीपेड प्लॅनची ​​नवीन किंमत 26 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दरम्यान, रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोनने (Vodafone) अद्याप दरवाढीची घोषणा केलेली नाही. मात्र, या कंपन्या लवकरच त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवू शकतात, असे म्हटले जात आहे.

गेल्या महिन्यात एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल (Airtel CEO Gopal Vittal) यांनी कंपनीच्या 350 दशलक्षहून अधिक युजर्सना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारा ईमेल पाठवला होता.

अनेक हॅकर्स आपल्या चतुराईनं युझर्सना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हा धोका लक्षात घेता, गोपाल विट्टल विट्टल यांनी फसवणुकीचा संदर्भ दिला होता. ज्यामध्ये एक फसवणूक करणारा एअरटेल एक्झिक्युटिव्ह म्हणून केवायसी अपडेटच्या बहाण्याने युजर्सकडून त्यांचे बँक तपशील मिळवायचा.

या ईमेलमध्ये त्यांनी अशा आर्थिक फसवणूक आणि फसवणूक करणाऱ्यांबद्दल आणि ते कशाप्रकारे अशी कामे करतात याबद्दल सांगितले होते. यासोबतच त्यांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीही ईमेलमध्ये सांगितल्या होत्या.

तसेच, सध्या मोठ्या प्रमाणात UPI अॅप्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे आजकाल मोठ्या प्रमाणात बनावट UPI अॅप्स तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी ईमेलमध्ये नमूद केले होते.

Read in English