Air India ला टाटा समुहाला द्यावी लागणार रॉयल्टी?; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:02 AM2022-01-21T11:02:45+5:302022-01-21T11:11:19+5:30

सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) ही टाटा समुहानं (TATA Group) खरेदी केली आहे.

सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) टाटा समूहाने (TATA Group) विकत घेतली आहे. आगामी काळात त्यांना टाटा सन्सला (TATA Sons) ब्रँड रॉयल्टी (Brand Royalty) द्यावी लागण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया अखेर काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

एअर इंडिया ही आता सरकारी कंपनी राहिली नसून ती टाटा समूहाची कंपनी बनली आहे. परंतु आता एअर इंडियाला टाटा या ब्रँडचा वापर करण्यासाठी टाटा सन्सला रॉयल्टी द्यावी लागू शकते असं वृत्त समोर येत आहे.

परंतु आता जेव्हा एअर इंडिया ही कंपनी टाटा समुहानंच खरेदी केली आहे, तेव्हा आपल्याच पेरेंट कंपनीला रॉयल्टी का द्यावी लागेल असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला आहे. जाणून घेऊया याबाबत.

तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी योग्य आहे. यामागचे कारण म्हणजे टाटा सन्सने एअर इंडियाच्या खरेदीसाठी त्यांच्या एका उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत बोली लावली होती. म्हणजेच एअर इंडिया तांत्रिकदृष्ट्या टॅलेसच्या हाती आली.

आता पुढे जाऊन रॉयल्टीच्या मुद्द्यावर येऊ. एकदा एअर इंडिया पूर्णपणे टॅलेसच्या हातात आल्यावर, जेव्हा नवीन एअरलाइन्स ऑपरेशन सुरू करेल, तेव्हा ते टाटा ब्रँड नाव वापरतील.

आता टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. टाटा ब्रँड वापरण्याच्या बदल्यात या नवीन एअरलाइनने त्यांना पैसे द्यावेत अशी तिची इच्छा आहे. टाटा समूहाकडे एअर इंडिया हस्तांतरित करण्याची औपचारिकता या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल.

या औपचारिकतांमध्ये ब्रँडची रॉयल्टी भरण्याच्या पद्धतीचाही उल्लेख आहे, पण इथून तुमच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की, टाटा समूहाचा विस्तारा आणि एअर एशियामध्ये हिस्सा आहे, मग तेही टाटा सन्सला कोणती रॉयल्टी देतात का?

तर याचे उत्तर नाही असे आहे. त्यामागील कारण म्हणजे विस्तारा आणि एअर एशिया टाटा ब्रँडचा वापर करत नाहीत. त्यामुळे त्यांना ती रॉयल्टी द्यावी लागत नाही.

पण याठिकाणी आणखी एक प्रश्न उद्भवतो की टाटा सन्स ब्रँड वापरण्यासाठी स्वतःच्या कंपन्यांकडून रॉयल्टी का घेते? समूहाच्या टाटा ब्रँड इक्विटी अँड बिझनेस प्रमोशन (TBEBP) योजनेमध्ये याचे उत्तर आहे. या योजनेअंतर्गत टाटा सन्स समूह कंपन्यांकडून रॉयल्टी घेते.