State Bank ची ग्राहकांसाठी नवी सुविधा; घरबसल्या Video KYC द्वारे खातं उघडण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 06:02 PM2021-04-24T18:02:21+5:302021-04-24T18:06:00+5:30

पाहा काय आहे सुविधा आणि कसं उघडू शकता तुमचं खातं

भारतीय स्टेट बँकेनं ग्राहकांसाठी एक नवी योजना आणली आहे. या अंतर्गत ग्राहकांना घरबसल्या YONO अॅपचा वापर करून व्हिडीओ केव्हायसीद्वारे बचत खातं उघडता येणार आहे.

शुक्रवारी बँकेनं यासंदर्भातील माहिती दिली. आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि चेहऱ्याची ओळख करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

ही पूर्णपणे संपर्कहीन आणि कागदविरहित ही सुविधा असल्याचं स्टेट बँकेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

ग्राहकांची सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिली.

यामुळे मोबाईल बँकिंगला एक नवा आयाम मिळेल आणि ग्राहकांना त्यांच्या बँकिंगशी निगडित गरजा डिजिटल बनवण्यास सक्षम ठरतील, असंही ते म्हणाले.

ज्यांना स्टेट बँकेत नवं बचत खातं सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम स्मार्टफोनवर योनो हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.

त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या न्यू टू एसबीआयवर क्लिक करून इन्स्टा प्लस सेव्हिंग अकाऊंट निवडावं लागेल.

अॅपमध्ये आपलं आधार कार्ड क्रमांका टाकून आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमची माहिती भरावी लागेल.

त्यानंतर व्हिडीओ कॉल शेड्युल करावा लागेल. व्हिडीओ केव्हायसी यशस्वी झाल्यानंतर ग्राहकांचं खातं उघडलं जाईल.

Read in English