Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:48 PM2021-06-11T12:48:37+5:302021-06-11T12:54:50+5:30

तेजीच्या लाटेचा फायदा करून घेण्यासाठी Adani समूह आणखी एक IPO आणण्याच्या तयारीला लागला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहातील विविध कंपन्या शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. अदानी एन्टरप्राइझेस आणि अदानी पॉवर या कंपन्यांनी गेल्या आठवड्याभरात नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत.

भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून अदानी समूहाने व्यावसायिक विस्तारावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले जात आहे. या तेजीच्या लाटेचा फायदा करून घेण्यासाठी अदानी समूह आयपीओ आणण्याच्या तयारीला लागला आहे.

अदानी समूहातील अदानी विल्मर या कंपनीकडून आयपीओतून ७ हजार ते ७ हजार ५०० कोटी उभारण्याची शक्यता आहे. अदानी विल्मर ही खाद्यतेल आणि विविध खाद्य वस्तूंची उत्पादन करणारी कंपनी आहे. फॉर्च्युन या ब्रँड नावाने कंपनीचे खाद्यतेल आहे. (adani wilmar)

समभाग विक्रीतून ७ हजार ते ७ हजार ५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अदानी विल्मर ही भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी अदानी समूहातील सातवी कंपनी ठरणार आहे.

अदानी समूहातील ६ कंपन्यांपैकी ५ कंपन्यांचे बाजार भांडवल एक लाख कोटींहून अधिक आहे. अदानी विल्मर हा अदानी समूह आणि सिंगापूरमधील विल्मर कंपनीचा संयुक्त उद्यम आहे. अदानी विल्मरची स्थापना १९९९ मध्ये झाली.

अदानी विल्मर ही खाद्यतेल आणि विविध खाद्य वस्तूंची उत्पादन करणारी कंपनी आहे. फॉर्च्युन या ब्रँड नावाने कंपनीचे खाद्यतेल आहे. अदानी विल्मरने २०२७ पर्यंत देशातील सर्वात मोठी खाद्य वस्तू उत्पादक कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कंपनीकडून खाद्य तेल, बासमती तांदूळ, आटा, मैदा, रवा, डाळ, बेसन यासारख्या खाद्य वस्तूंची निर्मिती केली जाते. कोरोना संकटात खाद्य तेलाचा भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे खाद्य तेल क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना मोठ फायदा झाला आहे.

देशातील आघाडीच्या तेल उत्पादकांचा विचार केला तर देशात अदानी विल्मरची वितरण व्यवस्था मोठी आहे. नुकताच अदानी समूहातील सहा सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १०० अब्ज डॉलरवर गेले.

अशा प्रकारची कामगिरी करणारा अदानी समूह तिसरा उद्योग समूह ठरला आहे. यापूर्वी टाटा समूह आणि रिलायन्स ग्रुपला अशी कामगिरी करता आली आहे.

अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्यांमध्ये अदानी एन्टरप्राइसेस , अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन , अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी या सहा कंपन्यांचा समावेश आहे.

भारत आणि आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील शेअरनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या काही महिन्यात अदानी समूहातील सर्वच शेअर तेजीत आहेत.

अदानी समुहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत तब्बल ४३ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३.१५ लाख कोटी रूपयांची वाढ दिसून आली. तसंच ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ७६.७ बिलियन डॉलर्स म्हणजेच ५.६० लाख कोटी रूपये झाली आहे. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

बाजारातील जाणकारांच्या मते अदानी यांच्या संपत्तीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, इतकंच काय तर जगातील सर्वात मोठी गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे मालक वॉरेन बफे यांच्यापेक्षाही तेजीनं वाढली आहे.

Adani Total Gas च्या शेअर्समध्ये यावर्षी तब्बल ३३० टक्क्यांची वाढ झाली. तर Adani Enterprises च्या शेअर्समध्ये २३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर Adani Transmission च्या शेअर्समध्ये तब्बल २६३ टक्क्यांची वाढ झाली आहे.