अदानी ग्रीनची ऐतिहासिक कामगिरी; एका वर्षांत ८७० टक्के वाढले शेअर्स, मार्केट कॅप २ लाख कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 01:29 PM2021-03-23T13:29:43+5:302021-03-23T13:35:19+5:30

Adani Green Energy Ltd: अदानी ग्रुपमधील एक असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीची बाजारपेठ प्रथमच २ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असून, गेल्या एका वर्षात अदानी ग्रीन एनर्जीचा वाटा ८७० टक्क्यांनी वाढला आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (Adani Green Energy Ltd) या कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मंगळवारी बाजार खुला होताच अदानी ग्रीन एनर्जीचे समभाग मुंबई शेअर बाजारात १,३१३.६० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला.

अदानी ग्रुपमधील एक असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीची बाजारपेठ प्रथमच २ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असून, गेल्या एका वर्षात अदानी ग्रीन एनर्जीचा वाटा ८७० टक्क्यांनी वाढला आहे. (adani green energy share increased by 870 percent)

अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स वाढल्यानंतर कंपनीची मार्केट कॅप दोन लाख कोटींपेक्षा जास्त झाली. तर अदानी ग्रुपच्या एकूण शेअर्समध्ये तब्बल सरासरी ९६५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. (adani green energy hit rupees 2 trillion market cap club)

अदानी समूहामध्ये अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सर्वांत मूल्यवान झाल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्कीट ५ टक्के होता. अदानी ग्रीनची एकूण नूतनीकरण क्षमता १५,१६५ मेगावॅट आहे.

अदानी ग्रीन एनर्जीच्या सहाय्यक कंपनीला ३०० मेगावॅट पवन प्रकल्पासाठी ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीचा शेअर्स चांगलाच वधारला, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रीन एनर्जी ग्रुपच्या सहाय्यक कंपनीला सौर ऊर्जा कॉर्पोरेशनकडून ३०० मेगावॅट पवन उर्जा प्रकल्पाचे काम मिळाले असून, या प्रकल्पासाठी निश्चित शुल्क २५ वर्षांसाठी २.७७ प्रति किलोवॅट आहे.

अदानी ग्रीनची एकूण नूतनीकरण क्षमतेपैकी ३३९५ मेगावॅट कार्यरत असून, ११,७७० मेगावॅट कार्यान्वयन आहे. देशातील नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील अदानी ग्रीन एनर्जी एक मोठी कंपनी आहे.

अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी सौर उर्जा प्रकल्पांमध्ये काम करते. अदानी ग्रीन एनर्जीचा टोरोंटो येथे मुख्यालय असलेल्या स्काय पॉवर ग्लोबलशी करार केला आहे. अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अदानी टोटल गॅसचे शेअर्स ९०७.८० टक्के, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स ८७३.४० टक्के, अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स ७३७.०५ टक्क्यांनी वाढले आहेत. ही वाढ गेल्या वर्षभरातील आहे.

दरम्यान, अदानी पोर्ट्स अ‍ॅंड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडने (APSEZ) आपल्या नफ्यामध्ये १६.२२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला एकूण १ हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका नफा झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.