जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 08:52 AM2020-05-22T08:52:44+5:302020-05-22T09:07:21+5:30

फेसबुक, सिल्वर लेक यांसारख्या कंपन्यांनी भागीदारी केल्यानंतर ही पाचवी मोठी गुंतवणूक असल्याचं मानलं जात आहे.

रिलायन्स जिओमध्ये पाचवी मोठी गुंतवणूक करण्यात आली असून, अमेरिकन कंपनी KKRने 11,367 कोटी रुपये गुंतवले आहेत.

फेसबुक, सिल्वर लेक यांसारख्या कंपन्यांनी भागीदारी केल्यानंतर ही पाचवी मोठी गुंतवणूक असल्याचं मानलं जात आहे. KKR कंपनीनं जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक करत 2.23 टक्के भागीदारी मिळवली आहे.

या करारानंतर जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी रुपये होणार आहे. आशियातील जिओ प्लॅटफॉर्ममध्ये केकेआरची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

गेल्या महिन्यापासून फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा, जनरल अटलांटिक आणि केकेआरने जिओ प्लॅटफॉर्मवर एकूण 78,562 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

अलीकडेच अमेरिकन कंपनी जनरल अटलांटिकनेही जिओ प्लॅटफॉर्मवर सुमारे साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.

केकेआरच्या गुंतवणुकीचं स्वागत करत असल्याचंही मुकेश अंबानींनी म्हटलं आहे.

डिजिटलमध्ये क्रांती घडवण्यासाठी केकेआर आम्हाला मदत करत आहे, केकेआरच्या अनुभवाचा नक्कीच आम्हाला फायदा होईल, असंही अंबानी म्हणाले आहेत.

दरम्यान, जिओ आणि केकेआरमध्ये काही काळापासून चर्चा सुरू होती आणि अखेर या कराराची घोषणा करण्यात आली आहे.

केकेआर अँड कंपनी 75 दशलक्ष ते 1 अब्ज डॉलर्स दरम्यान गुंतवणूक करू शकते. सौदी अरेबियाचा सरकारी फंड PIFला जियो प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे.

अमेरिकेतील मोठी प्रायव्हेट इक्विटी कंपनी सिल्व्हर लेक (Silver Lake) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (Reliance Jio) मध्ये गुंतवणूक केली होती.

या करारानुसार सिल्व्हर लेकने 75 कोटी डॉलर म्हणजेच 5,655.75 कोटींची गुंतवणूक जिओमध्ये करून 1.15 टक्के भागीदारी मिळवली होती.

. या करारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ची टेलिकॉम कंपनी जिओचे बाजारमूल्य 5.15 लाख कोटी रुपये झाले आहे.

Read in English