जोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल

By रूपाली मुधोळकर | Published: September 29, 2020 12:51 PM2020-09-29T12:51:27+5:302020-09-29T13:05:59+5:30

नवाबी घराण्यात झाला होता जोहरा यांचा जन्म, पाहा फोटो

हिंदी चित्रपटसृष्टीत अमूल योगदान देणा-या अभिनेत्री व नर्तकी जोहरा सेहगल यांना गुगलने खास डूडल समर्पित केले आहे. ते सुद्धा एका खास कारणासाठी...

होय, या डूडलच्या माध्यमातून जोहरा सेहगल यांच्या कामाची दखल गुगलने घेतली आहे. पार्वती पिल्लाई यांनी साकारलेल्या या डूडलमध्ये जोहरा क्लासिक डान्स पोजमध्ये दिसत आहेत.

जोहरा सहेगल यांना भारताची पहिला महिला अभिनेत्री मानली जाते. 1946 साली आजच्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला जोहरा यांचा ‘नीचा नगर’ हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रिलीज झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला हा पहिला भारतीय सिनेमा म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाला कान्स फेस्टिवलमध्ये ‘द पाल्म डीयोर’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. त्याच्या स्मरणार्थ गुगलने हे खास डूडल प्रसिद्ध केले आहे.

जोहरा सहगेल यांचा जन्म 27 एप्रिल 1912 रोजी रामपूरच्या नवाबी घराण्यात झाला होता. साहिबजादी जोहरा मुमताजुल्ला खान बेगम असे होते.

जोहरा लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले. जोहरा यांनी लाहोरला शिकावे, अशी आईची इच्छा होती. त्यामुळे जोहरा बहिणीसोबत लाहोरला गेल्या आणि क्वीन मेरी कॉलेजात प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये ‘पडदा’ होता आणि जोहरा यांना डान्सची आवड होती.

डान्सच्या वेडाने झपाटलेल्या जोहरा पुढे जर्मनीला गेल्या. येथील मेरी विगमनच्या बॅले स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. तीन वर्षे इथे त्या डान्स शिकल्या. याचदरम्यान भारताचे सुप्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्याशी त्यांची भेट झाली. विदेशात एका भारतीय तरूणीला इतके सुंदर नृत्य करताना बघून उदय शंकर प्रभावित झाले. त्यांच्यासोबत जोहरा यांनी देशविदेशात नृत्याचे अनेक कार्यक्रम केलेत.

1940 मध्ये जोहरा यांनी उदय शंकर यांच्यासोबत नृत्यशिक्षिका म्हणून कामास सुरुवात केली. याचदरम्यान त्यांची इंदोरचे तरुण शास्त्रज्ञ, चित्रकार आणि नर्तक कामेश्वर सेहगल यांच्याशी भेट झाली.

जोहरा व कमलेश्वर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. मात्र हे लग्न अनेकांना खटकले. विरोध इतका की, या लग्नामुळे अगदी दंगलीसारखी स्थिती निर्माण झाली होती.अर्थात पुढे सर्वांनी जोहरा व कमलेश्वर यांचे लग्न मान्य केले.

फाळणीदरम्यान जोहरा व कमलेश्वर लाहोरमध्ये गेले. येथे त्यांनी डान्स इन्स्टिट्यूटही सुरू केले. मात्र हे इन्स्टिट्यूट चालवणे तर दूर येथे जीव वाचवणेही कठीण आहे, असे त्यांना वाटू लागले आणि मग वर्षभराच्या मुलीला घेऊन जोहरा व कमलेश्वर मुंबईत आले.

जोहराची बहीण पृथ्वी थिएटरची मोठी हिरोईन् होती. 1945 मध्ये जोहरा यांनीही पृथ्वी थिएटर ज्वॉईन केले. पुढे ‘धरती के लाल’ या सिनेमात जोहरा यांना संधी मिळाली आणि जोहरांचा अभिनय प्रवास सुरु झाला. पुढे चेतन आनंद यांच्या ‘नीचा नगर’मध्येही काम मिळाले. चित्रपटात काम करण्यासोबत कोरिओग्राफर म्हणूनही त्या काम करू लागल्या.

1998 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2001 मध्ये त्यांना कालिदास सन्मान बहाल करण्यात आला. 2004 मध्ये ‘इंडियन नॅशनल अकॅडमी फॉर म्युझिक, डान्स अ‍ॅण्ड ड्रामा’ने जीवनगौरव पुरस्कारासाठी ‘संगीत नाटक अकादमी फेलोशीप’ हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांना गौरविले.

जोहरा सहगल पारंपरिकदृष्ट्या रूपवान नव्हत्या. असे असतानाही केवळ आपली अभिनय क्षमता आणि प्रचंड ऊर्जेमुळे त्या यशस्वी झाल्या़ काही वर्षांपूर्वीच त्या आपल्या एका चाहत्याला म्हणाल्या होत्या की, आज मी जेवढी कुरूप दिसते आहे, तेवढीच कुरूप तरुणपणीही होते. आज लोक स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी चेह-यावर भरपूर क्रीम लावतात, शरीराची काळजी घेतात; परंतु आतील कुरूपता त्यांना सुंदर होऊ देत नाही.’

‘ग्रॅण्ड ओल्ड लेडी’ या नावाने बॉलीवूडमध्ये परिचित असलेल्या जोहरा यांनी सन 2007 मध्ये शेवटची भूमिका रंगविली होती, संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटात. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जोहरा यांना 2010 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

10जुलै 2014 रोजी दिल्लीमध्ये जोहरा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या 102 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.