Aryan Khan Drugs Case: '...म्हणून आर्यन खानला टार्गेट केलं जातंय'; शत्रुघ्न सिन्हा यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 12:56 PM2021-10-13T12:56:14+5:302021-10-13T13:13:03+5:30

Aryan Khan Drugs Case: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानं मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. यातच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक मोठं विधान केलं आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं त्याला अटक केली असून त्याचवर खटला सुरू आहे. शाहरुखवर कोसळलेल्या संकटात आता अनेक सेलिब्रिटी त्याला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत.

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही आता या प्रकरणात उडी घेत शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. आर्यन खानवर सुरू असलेल्या खटल्या संदर्भात शत्रुघ्न सिन्हा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यात त्यांनी एक गंभीर आरोप देखील केला आहे.

शाहरुखच्या धर्माचा काही जण गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

"शाहरुखचा धर्म पाहून सारं काही केलं जातंय असं आपण म्हणू शकत नाही. पण काही लोक याच विषयाचा गैरवापर करु लागले आहेत आणि असं करणं अजिबात योग्य नाही. जो व्यक्ती भारतीय आहे असा प्रत्येक भारतीय व्यक्ती या देशाचा मुलगा आहे आणि सर्वांना संविधानानं समान अधिकार दिले आहेत", असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

"शाहरुख खान हेच सर्वात मोठं या प्रकरणात कारण ठरत आहे. ज्यामुळे आर्यनला टार्गेट केलं जात आहे. याप्रकरणात मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्यासारखी आणखी काही नावं देखील आहेत. पण त्यांची चर्चाच केली जात नाहीय. आर्यन शाहरुखचा मुलगा आहे म्हणूनच त्याला टार्गेट केलं जातंय", असं रोखठोक मत शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी याआधीच्या काही प्रकरणांचाही उल्लेख केला. "याआधी देखील जेव्हा अशी घटना समोर आली होती. त्यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोणवर लक्ष केंद्रीत केलं गेलं होतं. किंबहुना त्याही प्रकरणात इतर अनेक नावं होती. तरीही दीपिकावर लक्ष केंद्रीत केलं गेलं. यावेळी ते आर्यन खानसोबत खेळत आहेत. कारण तो शाहरुख खानचा मुलगा आहे", असं शत्रुघ्न म्हणाले.

बॉलीवूडकरांनी आर्यन खान प्रकरणावर बाळगलेलं मौन यावरही शत्रुघ्न यांनी भाष्य केलं. "बॉलीवूडमधला कोणताही व्यक्ती या प्रकरणावर स्पष्ट बोलला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची कल्पना त्यांना आहे. अशाप्रकारच्या घटनांमुळे कुटुंबीयांना खूप त्रास होतो. घराबाहेर निदर्शन केली जातात. त्यामुळे काही न बोलणंच अनेकजण पसंत करतात. जेव्हा तुम्ही कास्टिंग काऊच किंवा ड्रग्ज प्रकरणावर बोलता तेव्हा तुमची पारख केली जाऊ लागते", असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

आर्यन खान याला मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीत एनसीबीनं अटक केली होती. २ ऑक्टोबरच्या रात्री आर्यन खान याला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. पुढे चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून आर्यन खानची कोर्ट आणि तुरुंगवारी सुरू आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून याआधी एकदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Read in English