पाहा रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजाचे कधीही न पाहिलेले लग्नातील हे फोटो, अशी क्यूट आहे त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:41 PM2020-06-08T18:41:12+5:302020-06-08T18:55:05+5:30

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाच्या लग्नाची काही वर्षांपूर्वी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. कारण जेनेलिया ख्रिश्चन तर रितेश हिंदू असल्याने सुरुवातीला रितेशच्या घरातून या नात्याला विरोध होता.

रितेश आणि जेनेलियाची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लग्नासाठी होकार द्यायला जेनेलियाने चक्क 8 वर्षे लावलीत, यावरून या लव्हस्टोरीचा अंदाज यावा. आज रितेश व जेनेलियाची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती.

हैदराबाद विमानतळावर रितेश आणि जेनेलिया पहिल्यांदा भेटले. आश्चर्य वाटेल, पण या पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशला जराही भाव दिला नव्हता. कारण त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने रितेश गर्विष्ठ असेल, असा जेनेलियाचा समज होता. त्यामुळे त्याने अ‍ॅटिट्यूड दाखवण्यापूर्वी जेनेलियानेच त्याला अ‍ॅटिट्यूड दाखवायला सुरुवात केली होती.

हैदराबाद विमानतळावर रितेशने जेनेलियाला हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. जेनेलियाने हस्तांदोलन तर केले. पण न करावे अशा थाटात. पहिल्याच भेटीतील जेनेलियाच्या हे वागणे रितेशला खटकले. पण तो शांत राहिला. पुढे चित्रपटाच्या सेटवर रितेशचा खरा स्वभाव जेनेलियाला हळूहळू कळू लागला आणि दोघांत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हेही दोघांना कळले नाही.

‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.

जेनिलिया ख्रिश्चन असल्याने देशमुख कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध झाल्याचं बोललं जातं. मात्र कालांतराने रितेश-जेनिलियाच्या नात्याला सा-यांची संमती मिळाली.

अखेर १० वर्षाच्या रोमान्स नंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश-जेनिलिया रेशीमगाठीत अडकले. या दोघांचं दोनदा लग्न झालं. आधी हिंदू पद्धतीने मग ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं शुभमंगल थाटात पार पडलं.

रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.