भीती वाटली म्हणून नकार दिला...! पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा हैराण करणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:43 PM2021-05-18T15:43:51+5:302021-05-18T15:59:03+5:30

ती ‘रईस’या सिनेमात शाहरूख खानसोबत झळकली आणि भारतात तिचे फॅन फॉलोइंग अनेकपटीने वाढले. त्यानंतर मात्र कुठल्याही भारतीय प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. कारण काय तर भीतीपोटी.

ती ‘रईस’या सिनेमात शाहरूख खानसोबत झळकली आणि भारतात तिचे फॅन फॉलोइंग अनेकपटीने वाढले. त्यानंतर मात्र कुठल्याही भारतीय प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. कारण काय तर भीतीपोटी. आम्ही बोलतोय ते पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानबद्दल.

होय,‘रईस’नंतर माहिराला अनेक भारतीय प्रोजेक्टच्या ऑफर मिळाल्यात. पण तिने हे प्रोजेक्ट केवळ भीतीपोटी नाकारले. एका ताज्या मुलाखतीत माहिराने खुद्द हा खुलासा केला आहे.

उरी येथे 2016 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर, 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली होती. 

आता त्याला 3 वर्ष उलटून गेली आहेत. पण अद्यापही माहीराला भारतात यायची किंवा बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम करायची भीती वाटते.  

तिने सांगितले, अलीकडच्या काळात मला पुन्हा एकदा भारतातून काम करण्याबद्दल विचारणा होऊ लागली आहे. त्यातल्या काही वेबसीरीज होत्या. अनेक वेबसीरीजचा विषय खरच चांगला होता. पण तरीही या ऑफर मी नाकारल्या़ कारण मला भीती वाटते. भारतात काम केल्याचे काय राजकीय पडसाद उमटतील? असा विचार डोक्यात येतो. त्यामुळे अनेक ऑफर स्वीकाराव्या वाटत असूनही मी त्या नाकारल्या.

भारतात खूप संधी आहेत. पण या संधी स्वीकारता येत नाही, याचे वाईट वाटते. उरी हल्ल्यानंतर भारताने सर्व पाकिस्तानी कलाकारांवर बंदी लादली. त्यामुळे अनेक चांगले निर्माते-दिग्दर्शक पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घेण्यास उत्सुक नाहीत.  हा निर्णय खरंतर चुकीचा आहे. कारण आम्ही कलाकार आहोत़ कलाकार या नात्याने आम्ही काम करतो.  पण त्याचे राजकीय भांडवल केले जाते आणि त्यामुळे काम करावे की नाही.. याची भीती वाटते.  तिथे काम करण्याची मागणी होते. पण मग पुन्हा भीती वाटते, असेही ती म्हणाली.

गेल्यावेळचा माझा अनुभव खरंच दुर्दैवी होता. म्हणजे जे मी अनुभवले ते भीतीदायक होते.  त्यामुळे मी यापुढे असे काही काम करणार नाही हे ठरवून टाकले आहे, असेही तिने सांगितले.

माहिराने व्हीजे म्हणून करिअरची सुरुवात एमटीव्ही पाकिस्तानबरोबर केली होती. 2011 मध्ये बोल या पाकिस्तानी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

फवाद खानसोबतच्या 'हमसफर' या टीव्ही शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

2017 मध्ये माहिराने रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शित केला होता. माहिराचा हा एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे.