'मेड इन इंडिया' फेम गायिका अलिशा चिनाई सध्या आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, आता तिला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 07:23 PM2022-06-25T19:23:23+5:302022-06-25T19:29:24+5:30

Alisha Chinai : ९०च्या दशकातील 'मेड इन इंडिया' हे लोकप्रिय गाणे लोक कधीच विसरू शकणार नाहीत. १९९५ मध्ये आलेले हे गाणे अलिशा चिनॉयने गायले होते.

किती गाणी येतील आणि जातील, पण ९०च्या दशकातील 'मेड इन इंडिया' हे लोकप्रिय गाणे लोक कधीच विसरू शकणार नाहीत. १९९५ मध्ये आलेले हे गाणे अलिशा चिनॉयने गायले होते. या गाण्याने अलिशा रातोरात म्युझिक इंडस्ट्रीतील स्टार बनली.

अलिशाच्या गाण्यामुळे लोक तिला 'क्वीन ऑफ इंडीपॉप' म्हणू लागले. अलिशा चिनॉयच्या करिअरची सुरुवात हिंदी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये चांगली झाली, पण नंतर अचानक काय झालं कळलंच नाही आणि ती गायनाच्या जगातून गायब झाली.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये १९६५ मध्ये जन्मलेल्या अलिशाचे खरे नाव सुजाता चिनॉय होते. तिचा पहिला अल्बम 'जादू' १९८५ मध्ये आला होता, पण तिला खरी ओळख 'मेड इन इंडिया' या गाण्याने मिळाली.

अलिशा चिनॉयच्या हिट गाण्यांची यादी बरीच मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक गाण्याचा उल्लेख करता येत नाही. पण हो, 'दिल यह कहते है', 'डुबी डूबी', 'कांटे नहीं कट्टे', 'रुक रुक' आणि 'कजरारे' यांसारखी सुपरहिट गाणी नेहमीच प्रत्येकाच्या ओठांवर रुळताना दिसतात.

अलिशाला हिंदी चित्रपटसृष्टीत आणण्याचे श्रेय बप्पी लाहिरी यांना जाते, असे म्हटले जाते. बप्पी दांसोबत त्यांनी म्युझिक इंडस्ट्रीत अनेक हिट गाणी दिली. एवढेच नाही तर अलिशा चिनॉयने अनु मलिकसोबत अनेक हिट गाणीही दिली. तिने अनु मलिकसोबत टीव्हीवरील इंडियन आयडॉल ३ आणि स्टार या रॉकस्टार यांसारख्या रिअॅलिटी शोजचे परिक्षणही केले.

अलिशा आणि अनु मलिकचे बॉन्ड टीव्हीवर चांगले दिसत होते, पण एके दिवशी तिने अनु मलिकबद्दल धक्कादायक विधान केले. एका मुलाखतीदरम्यान अलिशाने अनु मलिक यांना 'हैवान' म्हणत छळ केल्याचा आरोप केला होता. पण अनु मलिक यांनी अलिशाच्या या गोष्टींना फारसे महत्त्व दिले नाही आणि प्रकरण फारसे पुढे गेले नाही.

अलिशा चिनॉयने १९८६ मध्ये मॅनेजर राजेश झवेरीशी लग्न केले. त्यांचे नाते ८ वर्षे सुरळीत चालले. मात्र राजेश आणि अलिशा यांनी १९९४ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.