Kiara Advani : कियारा अडवाणी आहे पक्की अंधश्रद्धाळू! सिनेमा साईन करेपर्यंत मुळीच करत नाही ‘ही’ गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:22 PM2022-05-12T14:22:11+5:302022-05-12T14:28:53+5:30

Kiara Advani : कियारा अडवाणी ही बॉलिवूडच्या आघाडींच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ग्लॅमरस, बोल्ड, ब्युटिफुल अशी कितीतरी विशेषणं तिला लावता येतील. पण हीच कियारा अंधश्रद्धाळू आहे असं सांगितलं तर?

मुंबईत हिरो-हिरोईन बनण्याचं स्वप्नं घेऊन रोज अनेक तरूण-तरूणी येतात. मात्र यापैकी बोटावर मोजता येईल इतकेच यशस्वी होतात. कियारा अडवाणी यातलंच एक नाव. अल्पावधीत तिनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

आज कियारा अडवाणी ही बॉलिवूडच्या आघाडींच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ग्लॅमरस, बोल्ड, ब्युटिफुल अशी कितीतरी विशेषणं तिला लावता येतील. पण हीच कियारा अंधश्रद्धाळू आहे असं सांगितलं तर?

होय,खुद्द कियारानं हा खुलासा केला आहे. नुकतीच ती ‘भुल भुलय्या 2’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेली होती. यावेळी तिनं हा खुलासा केला.

तू अंधश्रद्धाळू आहेस का? असा प्रश्न कपिलनं तिला केला. यावर ती म्हणाली. ‘मी मुळीच अंधश्रद्धाळू नाही. पण हो, एका बाबतीत मात्र मी पक्की अंधश्रद्धाळू आहे. चित्रपट साईन करेपर्यंत मी त्याबद्दल कोणालाच काही सांगत नाही,’ असं कियारा म्हणाली.

मी सिनेमा साईन करण्यासाठी कुणाला सांगितलं तर तो माझ्या हातातून जाईल, असं मला उगाचच वाटत राहतं. त्यामुळे साईन करेपर्यंत मी कुणालाच काही सांगत नाही, असंही कियारानं सांगितलं. तिचं उत्तर ऐकून सगळेच हैराण झालेत.

कियाराबद्दल सांगायचं तर, तिने फगली या कॉमेडी चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, लस्ट स्टोरीज, कबीर सिंह आणि शेरशाह यांसारख्या चित्रपटातून तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

कियाराचं खरं नाव कियारा नाही, तर आलिया आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कियाराचं नाव आलिया अडवाणी असं होतं.. नंतर बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने तिचं आलिया हे नाव बदललं. कारण तिच्याआधी आलिया भट नावाची एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती.

कियाराचा ‘भुल भुलय्या 2’ हा सिनेमा येत्या 20 मे रोजी रिलीज होतोय. हा याच नावाच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सिक्वल आहे. यात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे.