एक सामान्य मुलगी ते गानसम्राज्ञी...! फोटोंमधून पाहा लता दीदींचा संपूर्ण प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 10:42 AM2020-09-28T10:42:19+5:302020-09-28T10:55:17+5:30

गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा आज म्हणजचे 28 सप्टेंबरला वाढदिवस. आज लतादीदी 91 वर्षांच्या झाल्यात.

गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा आज म्हणजचे 28 सप्टेंबरला वाढदिवस. आज लतादीदी 91 वर्षांच्या झाल्यात.

लता दीदींचे नाव हेमा होते. मग त्यांचे लता नाव कसे पडले तर वडीलांनी त्यांचे हेमा हे नाव बदलून त्यांना लता हे नवे नाव दिले. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका हे पात्र प्रचंड गाजले होते. या पात्रावरून वडिलांनी दीदींचे हेमा हे नाव बदलून त्यांचे लता असे नामकरण केले.

वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांच्या नाटकात अभिनय करायला सुरूवात केली. यानंतर 1945 साली प्रदर्शित झालेल्या ‘बडी माँ’ या सिनेमातही त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती.

लतादीदींनी 1938 साली वयाच्या नवव्या वर्षी सोलापूरमधील नूतन थिएटरच्या नाटकासाठी राग कुंभवती आणि अन्य दोन गाणी गायली होती.

वयाच्या 13 व्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी त्यांनी पहिले गाणे गायले होते. पण तुम्हाला माहित आहे का, सिनेमाची लांबी कमी करण्यासाठी ऐनवेळी हे अख्ख गाणं सिनेमातून हटवण्यात आले होते.

यानंतर त्याच वर्षी आलेल्या ‘पहिली मंगळागौर’ या सिनेमातील ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गाणे त्यांनी गायले. हे त्यांचे पहिले गाणे ठरले.

पुढे हिंदी सिनेसृष्टीत त्यांचे पदार्पण झाले. वसंत जोगळेकर यांच्या ‘आप की सेवा में’ चित्रपटातील गाण्याने त्याचा हिंदी सिनेसृष्टीत प्रवास सुरु झाला.

लता यांना 1948 साली पहिला मोठा ब्रेक मिळाला. मजबूर सिनेमातील ‘दिल मेरा तोडा’ हे लता दीदींच्या आवाजात स्वरबद्ध केलेले गीत प्रचंड लोकप्रिय झाले. यानंतर महल या सिनेमातील ‘आएगा, आएगा, आएगा आनेवाला’ हे गीतही प्रचंड गाजले. पुढचा अख्खा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे.

लतादीदी त्यांच्या बालपणी फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. शाळेत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी बहीण आशासोबत इतर विद्यार्थ्यांना गाणं शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी अचानक वर्गात आलेल्या गुरुजींना ते अजिबात आवडलं नाही आणि ते त्यांना रागावले. त्यानंतर दीदी पुन्हा कधीही शाळेत गेल्या नाहीत.

लता मंगेशकर या अतिशय लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घरची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरसमध्ये गाणे गायले. तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला.

लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी त्यांच्या भावंडांना शिक्षण दिले. त्यांनी घरची जबाबदारी खूपच चांगल्याप्रकारे पेलली.

लता यांना त्यांच्या भावंडांविषयी अतिशय प्रेम आहे. पण लता आणि त्यांच्या लहान बहीण आशा भोसले या दोघींमध्ये अनेक वर्षं अबोला होता. लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्यासोबत आशा भोसले यांनी खूपच कमी वयात लग्न केले. लग्न झाले त्यावेळी आशा या 16 तर गणपत हे 31 वर्षांचे होते. आशा यांनी लग्न केल्यानंतर कित्येक वर्षं लता आपल्या बहिणीशी बोलत नव्हत्या.

1962 साली लतादीदी 32 वर्षांच्या असतांना त्यांना जेवणातून स्लो पॉईजन देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. लता यांच्या स्रेही पद्मा सचदेव यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. यानंतर लेखक मजरूह सुल्तानपुरी हे अनेक दिवस लता दीदींच्या घरी जात. आधी स्वत: जेवणाचा घास घेत आणि नंतरच लता दीदींना जेवण भरवले जाई. लता दीदींना कोणी मारण्याचा प्रयत्न केला होता, याचा खुलाा अद्याप झाला नाही.

अमरउजालाने दिलेल्या एका वृत्तानुसार, डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह आणि हृदयनाथ मंगेशकर खूप चांगले मित्र होते. ते एकत्र क्रिकेट खेळायचे. जेव्हा राज सिंह शिक्षणासाठी मुंबईत आले, त्यावेळी त्यांची आणि हृदयनाथ यांची ओळख झाली होती. राज सिंह यांचे घरी येणे-जाणेदेखील वाढले. त्यामुळे लता मंगेशकर यांच्यासोबत देखील त्यांची मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या मैत्रीची त्याकाळात मीडियामध्येही चांगलीच चर्चा रंगली होती. या दोघांनाही लग्न करायचे होते, मात्र ही गोष्ट सत्यात उतरू शकली नाही. असे म्हटले जाते की, सर्वसामान्य घराण्यातील मुलीशी लग्न करणार नाही, असे वचन राज यांनी आपल्या आई-वडिलांना दिले होते आणि त्याचमुळे आयुष्याच्या शेवटपर्यंत राज यांनी हे वचन पाळले़ ते देखील आयुष्यभर अविवाहित राहिले. लता मंगेशकर यांच्यापेक्षा राज 6 वर्षांनी मोठे होते.

Read in English