बॉलिवूडची ती पहिली फीमेल सुपरस्टार जी एका सिनेमासाठी हिरोपेक्षा ५० पटीने जास्त घेत होती मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:08 PM2022-05-12T14:08:22+5:302022-05-12T14:22:38+5:30

Actress Sulochana : आज आम्ही तुम्हाला ३ मे १९१३ ते १४ मार्च १९३१ दरम्यान बनलेल्या मूकपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रूबी मायर्स (Ruby Myers) ची कहाणी सांगणार आहोत.

३ मे १९१३ रोजी भारतीय सिनेमाचा पहिला मूकपट 'राजा हरिश्चंद्र' रिलीज झाला होता. भारतीय सिनेमाला आता १०९ वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षात इंडस्ट्रीने एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार दिले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री रूबी मायर्स उर्फ सुलोचना. आज आम्ही तुम्हाला ३ मे १९१३ ते १४ मार्च १९३१ दरम्यान बनलेल्या मूकपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रूबी मायर्स (Ruby Myers) ची कहाणी सांगणार आहोत.

रूबी मायर्सचा जन्म १९०७ मध्ये महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला होता. ती भारतात राहणाऱ्या ख्रिश्चन वंशातील होती. तशी ती ब्रिटिश वंशाची होती. तिचं शिक्षणही पुण्यात आल. त्यानंतर ती एका कंपनीत टेलीफोन ऑपरेटर म्हणून काम करत होती. टायपिंग स्पीडमध्ये तिचा कुणी हात पकडत नव्हतं आणि सुंदर इतकी की, बघतच रहावं. अशात कोहिनूर फिल्म कंपनीचे मालक मोहन भगनानी यांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी तिला लगेच सिनेमात काम करण्याबाबत विचारलं तर तिने नकार दिला.

कारण त्या काळात सिनेमात काम करणं महिलांसाठी असभ्य मानलं जात होतं. पण सुलोचनाच्या सौंदर्यावर भाळलेले मोहन भगनानी यांनी तिला हिरोईन बनवण्याचा निश्चय केला होता. अखेर रूबी सिनेमात काम करण्यासाठी तयार झाली. तिला अभिनयाचा कोणताही अनुभव नव्हता. रूबीने १९२५ मध्ये 'वीर बाला' सिनेमापासून आपल्या करिअरला सुरूवात केली. सिनेमात तिला मिस रूबी म्हणून क्रेडीट मिळालं. त्यानंतर रूबी मायर्स सुलोचना बनली.

भारतात १९१० ते १९३० दरम्यान अनेक मूकपट तयार झाले. या काळात सिनेमात अभिनय करणं फार अवघड काम होतं. त्यावेळी सिनेमात तिला बघण्यासाठीच लोक गर्दी करत होते. तेव्हा तिच्याकडे निर्मात्यांची रांग लागली होती. निर्माते तिला ती म्हणेल तेवढं मानधन देत होते. त्यावेळी मोठे मोठे अभिनेते केवळ १०० रूपये मानधन घेत होते. तिथे सुलोचना एका सिनेमासाठी ५ हजार रूपये मानधन घेत होती.

मोहन भवनानी यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या सिनेमांनी सुलोचनाला स्टार बनवलं होतं. पण काही सिनेमांनंतर सुलोचनाने कोहिनूर फिल्म कंपनी सोडून इंपीरिअल फिल्म कंपनी जॉइन केली. या कंपनीसोबत सुलोचनाने साधारण ३७ सिनेमे केले. सुलोचना एक सुपरस्टार बनली होती.

सुलोचना एकापाठी एक हिट सिनेमे देत होती. त्या काळात अभिनेते सायकलने सेटवर येत होते. पण सुलोचन शेवरले आणि रॉल्स रॉयस सारख्या लक्झरी कार्समध्ये सेटवर येत होती. जेव्हा ती कारमधून उतरत होती तेव्हा तिला बघण्यासाठी लोकांची गर्दी होत होती.

१९३० पर्यंत सुलोचन फिल्म इंडस्ट्री नंबर वन अभिनेत्री बनली होती. पण १९३१ मध्ये जेव्हा भारतात पहिला बोलपट 'आलम आरा' मध्ये जुबैदाला कास्ट करण्यात आलं. याचं कारण सुलोचनाला हिंदी चांगली येत नव्हती. यामुळेच अनेक सिनेमे तिच्या हातून गेले. अशात सुलोचनाने एक वर्षाचा ब्रेक घेऊन हिंदी भाषा शिकली आणि जोरदार कमबॅक केलं. १९३० मध्ये तिने स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली.

स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी सुरू करूनही आणि हायएस्ट पेड अभिनेत्री असूनही नूरजहां, खुर्शीद, सुरैया सारख्या नव्या अभिनेत्री आल्याने सुलोचनाची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. पण तिचा तोरा आणि महागडे शौक आधीसारखेच होते. एक वेळ अशीही आली जेव्हा सुलोचनाला इंडस्ट्रीत काम मिळणं बंद झालं. पण तिने कुणासमोरही हात पसरले नाहीत.

सुलोचना इंडस्ट्रीची पहिली फीमेल सुपरस्टार होती जी नंतर ज्यूनिअर आर्टिस्ट बनली. सुलोचनाचा सिनेमा 'अनारकली' तिसऱ्यांदा बनला तेव्हा मुख्य भूमिका बीना रॉयला देण्यात आला. सुलोचनाला सलीमची आई जोधाबाईची भूमिका मिळाली. ती नंतर साइड रोलच करत राहिली.

सुलोचनाने ६५ वर्षाच्या तिच्या फिल्मी करिअरमध्ये १०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. १९७३ मध्ये भारतीय सिनेमातील योगदानासाठी तिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. १० ऑक्टोबर १९८३ मध्ये तिने जगाचा निरोप घेतला.