दिव्या भारतीच्या निधनाच्या रात्री घडल्या होत्या अशा घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:33 PM2020-03-05T17:33:46+5:302020-03-05T17:53:19+5:30

दिव्या भारतीच्या निधनानंतर स्टारडस्ट मासिकाचे पत्रकार ट्रॉय रिबेरियो यांनी एक लेख लिहिला होता. त्या दिवशी काय काय घडले हे सगळे त्यांनी त्यात नमूद केले होते.

दिव्या, फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि तिचे पती डॉ. श्याम लुल्ला दिव्याच्या घरी होते. दिव्याने प्रचंड दारू प्यायली होती. तिच्या घराच्या बाल्कनीत बसायला तिला खूप आवडत असे. नेहमीप्रमाणेच ती बाल्कनीत बसली होती. पण दारूच्या नशेत असल्याने दिव्याचा तोल गेला आणि ती बाल्कनीतून खाली पडली.

दिव्याला लगेचच श्याम लुल्ला आणि दिव्याच्या बिल्डिंगमध्ये राहाणारे दिग्दर्शक व्ही मेनन कूपर रुग्णालयात घेऊन गेले तर नीता आणि दिव्याच्या घरात काम करणारी बाई दिव्याच्या घरी ही गोष्ट सांगायला गेली. दिव्याचा जीव वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. पण तिला वाचवण्यात अपयश आले.

दिव्याची बातमी इंडस्ट्रीतील लोकांना कळल्यावर पंकज निहलानी पत्नी, मुलगा आणि निर्माते राजू मवानीसोबत तिथे आले. दिव्याच्या वडिलांची तब्येत तोपर्यंत पूर्णपणे ढासळली होती. त्यांना सायकॅट्रिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची काळजी पंकज घेत होते. त्यानंतर काहीच वेळात मोरानी ब्रदर्स आपल्या पत्नीसमवेत तिथे आले. थोड्याच वेळात बोनी कपूर, गोविंदा, दिव्याची सेक्रेटरी ज्योती, निर्माते राहुल गुप्ता, सुनील सैनी, संजय कपूर, सैफ अली खान, कमल सदनाद असे इंडस्ट्रीतील लोक रुग्णालयात जमा व्हायला लागले.

दिव्याचे निधन झाले हे तिचा पती साजिद नाडियाडवालाला सहनच होत नव्हते. तो खाली कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना तो सतत सांगत होता की, तुम्ही काहीही करा... पण माझ्या पत्नीला परत आणा.

दिव्याचे अंत्यसंस्कार कोणत्या रितीरिवाजाप्रमाणे करायचे यासाठी साजिद आणि दिव्याच्या आईमध्ये चांगलाच वाद रंगला होता. दिव्याने साजिदसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे तिचे अंत्यविधी इस्लाम धर्माप्रमाणे केले जावे असे तो दिव्याच्या कुटुंबियांना सांगत होता. पण अखेरीस हिंदू रितीरिवाजाप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिव्याला एखाद्या वधूप्रमाणे सजवण्यात आले होते.