IN PICS : कधीही पाहिले नसतील रजनीकांत यांचे हे फोटो, कधीही वाचला नसेल हा किस्सा!!

By रूपाली मुधोळकर | Published: December 12, 2020 08:00 AM2020-12-12T08:00:00+5:302020-12-12T08:00:02+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस

साऊथचा ‘देव’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. चार दशकांपेक्षा अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रजनीकांत म्हणजे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. म्हणूनच आजही त्यांचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहते बेभान होतात.

चित्रपटगृहाबाहेर भल्या पहाटे तिकिटासाठी रांगा लागतात. शहरात मोठ मोठे होर्डिंग लागतात. या होर्डिंगला दुधाचा अभिषेक घालण्यापासून तर वाजत गाजत मिरवणुका काढण्यापर्यंत सगळे काही चाहते करतात. आज रजनीकांत यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक थक्क करणारा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2007 साली रजनीकांत यांचा ‘शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरडुपर हिट झाला. याचवेळचा हा किस्सा. खुद्द रजनीकांत यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता. ‘शिवाजी’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर रजनीकांत यांनी देवदर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. पण मंदिरात जायचे तर त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न होता. शेवटी यावर तोडगा काढला गेला. तो म्हणजे, रजनीकांत यांना एका म्हाता-याच्या वेशात मंदिरात पाठवण्याचे ठरले. त्यानुसार, म्हाता-याच्या वेशात रजनीकांत मंदिर परिसरात दाखल झाले. साहजिकच त्या वेशात त्यांना कुणीही ओळखले नाही. रजनीकांत मंदिराच्या पाय-या चढत असताना एक महिलाही त्यांच्यासोबत पाय-या चढत होती. त्या महिलेने रजनीकांत यांना चक्क भिकारी समजून 10 रूपयांची नोट भीकेपोटी दिली.

विशेष म्हणजे, रजनीकांत यांनीही ती नोट स्वीकारली. काही क्षणानंतर रजनीकांत मंदिराच्या गाभा-यात पोहोचले आणि त्यांनी स्वत:जवळचे असतील नसतील तितके पैसे दान केले. योगायोगाने त्याक्षणी ती महिलाही त्यांच्या बाजूला होती. ती स्तब्ध झाली. कारण ही म्हातारी व्यक्ती भिकारी नसून सुपरस्टार रजनीकांत असल्याचे तोपर्यंत तिला कळले होते. रजनीकांत यांना ओळखताच तिने त्यांची माफी मागितली.

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये बंगळूरू येथील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांची आई गृहिणी होती तर वडील रामोजीराव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून वडिलांनी रजनीकांत यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं. ते घरी मराठी आणि बाहेर कन्नड भाषा बोलायचे.

चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते.

रजनीकांत यांचं बालपण फारच हलाखीच्या परिस्थितीत गेलं. जेव्हा ते पाच वर्षांचे होते त्यावेळी त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी रजनीकांत यांच्या खांद्यावर आली. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कधी हमालाचं काम केलं तर कधी बस कंडक्टरची नोकरी.

रजनीकांत यांनी ‘अपूर्वा रागनगाल’ या तमिळ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ज्यात त्यांच्या सोबत कमल हसन आणि श्रीविद्या यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अनेक खलनायकी भूमिका साकारल्यानंतर शेवटी रजनीकांत यांनी नायक साकारला. एसपी मुथुरमन यांच्या 'भुवन ओरु केल्विकुरी' मध्ये त्यांना नायकांची भूमिका मिळाली.

1980 मध्ये रजनीकांत लता यांना पहिल्यांदा भेटले आणि पहिल्याच भेटीत त्यांना प्रेम झाले. रजनीकांत आपल्या ‘थिल्लू मल्लू’ या चित्रपटाचे शूटींग करत होते. या चित्रपटाच्या शूटदरम्यान रजनीकांत यांना मुलाखतीसाठी विचारणा झाली. कॉलेजची लता रंगाचारी ही मुलगी ही मुलाखत घेऊ इच्छित होती. रजनीकांत या मुलाखतीसाठी तयार झाले आणि लता मुलाखतीसाठी पोहोचली. या मुलाखतीदरम्यान रजनीकांत यांनी लता यांना पहिल्यांदा पाहिले आणि या पहिल्या भेटीत ते लता यांच्या प्रेमात पडले.

अभिनयासोबतच रजनीकांत त्यांच्या हटके अंदाज आणि स्टाइलसाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या सिग्नेचर वॉकसोबतच सिगारेट फ्लिप करण्याची त्यांची खास स्टाइल खूप पसंत केली जाते.

Read in English