100 कोटी पाण्यात...! आता नव्याने शूट होणार ‘बाहुबली- बिफोर द बिगनिंग’ सीरिज !!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:00 AM2021-03-17T08:00:00+5:302021-03-17T08:00:08+5:30

या सीरिजच्या 9 एपिसोडवर सुमारे 100 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. पण आता हा पैसा वाया गेला आहे.

आधी करिना कपूरने ‘रत्नावती’ची स्क्रिप्ट नाकारली. यानंतर आमिर खानने ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकच्या पटकथेला नकार कळवला. आता नेटफ्लिक्सने ‘बाहुबली- बिफोर द बिगनिंग’ या बहुप्रतिक्षीत सीरिजचे शूट झालेले सर्व एपिसोडे कचºयाच्या डब्यात फेकलेत. कारण एकच, स्क्रिप्ट.

होय, स्क्रिप्टचा दर्जा अगदीच सुमार असल्यामुळे या सर्व पटकथा नाकारल्या गेल्यात. ‘बाहुबली- बिफोर द बिगनिंग’ या सीरिजबाबतही नेमके हेच घडले.

‘बाहुबली- बिफोर द बिगनिंग’ ही वेबसीरिज आनंद नीलकंठन यांच्या ‘द राइज आॅफ शिवगामी’ या कादंबरीवर आधारित आहेत. गतवर्षी एप्रिलमध्येच ही सीरिज रिलीज होणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीही घडले नाही.

अपेक्षा मोठ्या होत्या. पण या अपेक्षांच्या कसोटीवर सीरिज फेल झाली आणि नेटफ्लिक्सने अख्खी सीरिजच नाकारली. आता मेकर्सला ही सीरिज पुन्हा नव्याने बनवावी लागणार असल्याने साहजिकच खळबळ माजली आहे.

नेटफ्लिक्सच्या या सीरिजच्या 9 एपिसोडवर सुमारे 100 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. पण आता हा पैसा वाया गेला आहे. नेटफ्लिक्सने निर्मात्यांना ही सीरिज पुन्हा नव्याने बनवण्यास सांगितले आहे.

या सीरिजची हिंदी आवृत्तीकडून नेटफ्लिक्सला प्रचंड अपेक्षा होत्या. यामुळे आपल्या ग्राहकांमध्ये प्रचंड वाढ अपेक्षित होती. पण प्रत्यक्षात हिंदी सीरिज अतिशय सुमार असल्याचे पाहून नेटफ्लिक्सची निराशा झाली.

आता नेटफ्लिक्सची ही सीरिज पुन्हा नव्याने शूट होणार आहे. नवी स्क्रिप्ट आणि नव्या बजेटसह. होय, आधी या सीरिजवर 100 कोटी खर्च झालेत. हे पैसे वाया गेलेत. पण त्याची पर्वा न करता आता नेटफ्लिक्सने बजेट वाढवून 200 कोटी केला आहे.

‘बाहुबली- बिफोर द बिगनिंग’ या सीरिजमध्ये शिवगामीदेवीचे अख्खे आयुष्य दाखवले जाणार आहे. पण आता ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बाहुबली सिनेमात शिवगामीची भूमिका राम्या कृष्णनने साकारली होती. या सीरिजमध्ये ही भूमिका मृणाल ठाकूर करताना दिसणार आहे.