नारळाचे माहीत नाही, पण नवरा कसा निघेल हे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने सांगता येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:51 PM2022-05-06T12:51:59+5:302022-05-06T13:01:21+5:30

लग्न ही एक लॉटरी असते. नशीबवंतांनाच लागते. लग्न होणे सामान्य बाब आहे, पण चांगला जोडीदार मिळणे नशिबाचा भाग आहे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासानुसार सरासरी पाहता पुढे दिलेल्या अद्याक्षरांची मुले चांगला जोडीदार म्हणून सिद्ध होतात. आता ओढून ताणून याच अद्याक्षराचा जोडीदार हवा असा हट्ट धरता येणार नाही, कारण लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण त्याचे आद्याक्षर कर्मधर्म संयोगाने तेच निघाले तर तुमची लॉटरी लागली असे समजा! आणि त्या नशीबवंतांमध्ये तुमचाही नंबर लागण्यासाठी लेख शेवट्पर्यंत वाचा, कारण शेवटी दिली आहे एक उपयुक्त टीप!

आपल्याकडे एक म्हण आहे, नवरा आणि नारळ कसा निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्योतिष शास्त्राची मदत घेऊन जोडीदाराला ताडून पाहणे जरा सोपे जाईल. चला तर मग, ही उत्तम जोडीदार म्हणून सिद्ध होणारी आद्याक्षरे कोणती ते जाणून घेऊ

अशी मुले ज्यांचे नाव 'अ' अक्षराने सुरू होते, ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. आपल्या पत्नीची खूप काळजी घेतात. तिच्या छोट्यात छोट्या सुखासाठी धडपडतात. ते एक चांगले पिता, चांगले पती आणि चांगले पुत्र म्हणून सिद्ध होतात

'क' या अद्याक्षराची मुले फारच विश्वासू असतात. ती आपल्या जोडीदाराला धोका देत नाहीत. एकपत्नीव्रत असतात. जोडीदाराला पदोपदी साथ देतात. त्यांना संसाराचा समतोल उत्तम प्रकारे साधता येतो. ते आपल्या जोडीदाराच्या विकासाला हातभार लावतात. साथ देतात.

ज्या मुलांचे नाव प अक्षराने सुरू होते ते आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि आयुष्यभर त्यांना सुखी ठेवतात. त्यांची विनोदबुद्धी चांगली असते. ते वाद होऊ न देता संवाद साधतात. जोडीदाराला समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

ज्या मुलांचे नाव र अक्षराने सुरू होते, ते बाहेरच्या जगावर राग राग करतील पण जोडीदारावर खूप प्रेम करतील, हे त्यांचे वैशिष्ट्य! त्यांचे व्यक्तिमत्त्व फणसासारखे बाहेरून काटेरी आणि आतून गोड असे असते. ते आपल्या कुटुंबाची पुरेपूर काळजी घेतात, त्यांना कुठलीही उणीव भासू देत नाहीत.

ज्या मुलांचे नाव व अक्षराने सुरू होते ते आपला मनपसंत जोडीदार आपणहून शोधतात आणि मिळवतात. ते प्रेमविवाह करण्याला प्राधान्य देतात. ते खूप रोमँटिक असतात आणि पत्नीच्या भावनांची खूप काळजी घेतात. त्यांच्यात थोडा अहंभाव असतो, पण ते बायकोपुढे झुकते माप घेतात.

तुमचा जोडीदार वरील दिलेल्या अद्याक्षरांपैकी एक नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. आई-आजीने सांगितलेला नियम लक्षात ठेवा, कोणताही नवरा चांगला नसतोच, तो बायकोलाच चांगला घडवावा लागतो!