Venus and Mars Conjunction 2022: शुक्र-मंगळाची युती: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना सुख, समृद्धीचा काळ; विविध लाभांचे उत्तम योग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:20 AM2022-01-26T08:20:59+5:302022-01-26T08:24:16+5:30

Venus and Mars Conjunction 2022: धनु राशीत होत असलेल्या शुक्र आणि मंगळाच्या युतीचा नेमका कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील प्रत्येक ग्रह नियोजित वेळेनुसार ब्रह्मांडात भ्रमण करत असतो. त्यावेळी ते बारा राशींतूनही प्रवास करत असतात. सन २०२२ हे वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे मानले जात आहे. कारण अनेक महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. (Venus and Mars Conjunction 2022)

तसेच एकाच राशीत दोन किंवा तीन ग्रह एकाचवेळी उपस्थित असतील, तर त्या युतीचा त्या राशीच्या व्यक्तीसह अन्य राशीच्या व्यक्तींवर शुभ-प्रतिकूल प्रभाव पडत असतो. त्यानुसार, आता गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत शुक्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रह विराजमान आहेत. (shukra mangal yuti in dhanu rashi 2022)

धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती झालेली आहे. याचा ५ राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडणार असून, हा काळ सुख-समृद्धी आणि विविध प्रकारचे लाभ मिळून देणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. शुक्र धनु राशीत मार्गी होत आहे. (venus and mars conjunction 2022 in sagittarius)

शुक्र हा सौंदर्य, कला, सृजनशीलता, रोमान्स यांचा कारक मानला जातो. तर मंगळ ग्रह साहस, पराक्रम, ऊर्जा, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. मंगळ हा क्रूर आणि उग्र ग्रह मानला गेला असून, तुलनेने शुक्र शांत ग्रह असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शुक्र आणि मंगळाच्या धनु राशीतील युतीचा नेमका कोणाला फायदा होईल, ते जाणून घेऊया...

शुक्र आणि मंगळाची युती मिथुन राशीच्या व्यक्तींना सकारात्मक लाभ मिळू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी अनुकूल काळ ठरू शकेल. भागीदारीतील व्यवसाय, उद्योग, व्यापारातून फायदा मिळू शकेल. समाजात मान-सन्मान मिळू शकेल. शुक्र-मंगळाची युती मिथुन राशीसाठी शुभ ठरू शकेल. नेतृत्व क्षमतेत वाढ होईल, असे सांगितले जात आहे.

शुक्र आणि मंगळाची युती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकेल. विद्यार्थी वर्गाला उत्तम यशकारक कालावधी ठरू शकेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळतील. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनाही ही युती प्रगतीकारक ठरू शकेल. मुलांविषयीच्या चिंता दूर होतील. पराक्रम आणि आक्रमकता वाढीस लागू शकेल.

शुक्र आणि मंगळाची युती कन्या राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात चांगले प्रदर्शन करता येईल. सहकाऱ्यांचे योग्य सहकार्य लाभेल. जोडीदाराशी असलेले नाते दृढ, मजबूत होऊ शकेल. सहलीच्या योजना आखू शकाल. नोकरीच्या नव्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. मान-सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊ शकेल. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकतील.

शुक्र आणि मंगळाची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. एकाग्रतेने कामे केल्यास त्याचा फायदा मिळू शकेल. मात्र, अतिआत्मविश्वास घातक ठरू शकेल, असा सल्ला दिला जात आहे. आपल्याला मिळत असलेल्या ऊर्जेचा, सकारात्मकतेचा योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास त्याचा लाभ मिळू शकेल. प्रवासाचे योग जुळून येतील.

शुक्र आणि मंगळाची युती कुंभ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. मेडिकल, सेना, पोलीस, मीडिया, कला या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना विविध प्रकारचे लाभ मिळू शकतील. आर्थिक आघाडी मजबूत राहील. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. व्यापारी, उद्योजकांना नफा कमावण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. मात्र, आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे.