Mahashivratri 2021: महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; पाहा, झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 03:50 PM2021-03-10T15:50:00+5:302021-03-10T15:57:57+5:30

Mahashivratri 2021 महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पाहा, खास क्षणचित्रे...

मराठी वर्षात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सण-उत्सवांपैकी महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे.

तसे पाहायला गेल्यास प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते.

सन २०२१ मध्ये ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र आहे. शिवभक्त मोठ्या श्रद्धेने हा सण साजरा करीत असतात.

यंदा मात्र महाशिवरात्रीच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.

तरीही घरच्या घरी किंवा सर्व नियम पाळून शिवभक्त महाशिवरात्रीचा सण साजरा करतील, असे सांगितले जात आहे.

मुंबईतील प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

मुंबईतील अनेक सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तर हे मंदिर भक्तांनी संपूर्ण भरलेले असते.

राजा भीमदेवद्वारे साधारण १२ व्या शतकात या प्राचीन मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते.

काळानुसार यात बदल झाला असला तरीही पुरातन काळापासूनचे शिल्प आजच्या घडीलाही या मंदिरात आहेत. पूर्वी हे मंदिर पारशी लोकांच्या अखत्यारीत होते.

साधारण नव्वदीच्या दशकात मुंबईतील सर्वात उंच मंदिर म्हणून बाबुलनाथ मंदिराची ओळख होती. येथील मंदिर पुजारी असलेल्या व्यक्तींनाही खूपच मान देण्यात येतो.

चर्नी रोड वा ग्रँट रोड स्टेशनवरून बस वा टॅक्सी करून बाबुलनाथ मंदिरात जाता येते.

महाशिवरात्री हा सण शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने शिवपूजन केले जाते.

शिवपूजनात रुद्राभिषेकाला मोठे महत्त्व आहे. शिवपूजनासह महादेव शिवशंकरांचे नामस्मरण, आराधना, उपसना केली जाते.

शंकराला आपण भोळा सांब असे म्हणतो. शिवाय त्याचे एक नाव आशुतोष असेही आहे. आशुतोष म्हणजे पटकन संतुष्ट होणारा देव.

अनेकांना १६ सोमवरांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.