Shravan Somvati Amavasya 2021: श्रावणी सोमवती अमावास्या: शुभ, मुहूर्त, योग, महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:01 PM2021-09-05T20:01:19+5:302021-09-05T20:06:02+5:30

Shravan Somvati Amavasya 2021: श्रावणी सोमवती अमावास्येचा शुभ मुहूर्त, योग, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...

श्रावणाची सांगता सोमवती अमावास्येला होत आहे. यानंतर चातुर्मासातील पुढील भाद्रपद महिन्याची सुरुवात होत आहे. अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते.

अमावास्या अशुभ असते, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. अमावास्येला अनन्य साधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. सोमवती अमावास्येचा शुभ मुहूर्त, योग, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया... (Shravan Somvati Amavasya 2021)

श्रावण सोमवती अमावास्येचा प्रारंभ सोमवार, ०६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनंतर सुरू होत असून, मंगळवार, ०७ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे ०६ वाजून २१ मिनिटांनी संपेल. पौराणिक मान्यतेनुसार, सोमवारी अमावास्या सुरू होणे, भाग्यकारक मानले गेले आहे.

सोमवारी महादेव शिवशंकराची पूजा केली जाते. म्हणूनच सोमवती अमावास्येला शंकराची पूजा, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात.

या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे सोमवती अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त होते.

सोमवती अमावास्येच्या दिवशी पितरांची आठवण काढली जाते. यानिमित्ताने पिंडदान करून पूर्वजांचे पूजन केले जाते. देशातील अनेक भागात अशी परंपरा आहे. ज्या व्यक्तींच्या राशीत चंद्र ग्रह कमकुवत असतो. त्या व्यक्तींनी सोमवती अमावास्येला गोमातेला अन्नदान करावे, असा सल्ला दिला जातो.

चंद्र ग्रहाशी संबंधित व्याधी यामुळे दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. गंगास्नान शक्य नसलेल्या व्यक्तींनी नदी किंवा तलावात स्नान करावे, असे सांगितले जाते.

सोमवती अमावास्येच्या अनेक कथा प्रचलित आहेत. यामध्ये एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याची कथा प्रसिद्ध येते. या दाम्पत्याला सर्वगुण संपन्न अशी एकुलती एक मुलगी होती. मुलगी विवाहयोग्य झाल्यावर वडिलांनी वर शोधण्यास सुरुवात केली. मात्र, योग्य वर मिळत नव्हता. विवाह योग जुळून येत नव्हता. एके दिवशी एक साधू या ब्राह्मणाच्या घरी आला.

मुलीने केलेल्या सेवेने तो प्रभावित झाला आणि त्या मुलीला दीर्घायुष्याचा आशिर्वाद दिला. ब्राह्मणाने विवाह जुळत नसल्याचे सांगितले. यावर, मुलीच्या हातावर विवाह रेषा नसल्याचे साधूने कथन केले. यावर एक उपाय साधू महाराजांनी ब्राह्मणाला सांगितला.

साधूचे कथन ऐकून ब्राह्मण कन्येने सोना नामक धोबी महिलेची सेवा करण्याचा निश्चय केला. सूर्योदयापूर्वी त्या महिलेच्या घरी जाऊन ती कन्या सेवा करत असे. महिलेला वाटे की, आपली सून हे सर्व काम करते. मात्र, सूनेला विचारल्यावर आपण दिवसभर आराम करत असल्याचे ती सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यास एक कन्या येऊन सर्व काम करताना दिसते.

ब्राह्मण कन्येला तिच्या कृतीचा जाब विचारल्यावर ती त्या महिलेला शरण जाते आणि तिची समस्या कथन करते. धोबी महिला दुसऱ्या दिवशी येऊन कुंकू घेऊन जाण्याबाबत आश्वस्थ करते. दुसरा दिवस हा सोमवती अमावास्येचा असतो. आपले कुंकू दिल्याने पतीचे निधन होऊल हे महिलेला समजते. मात्र, तरीही ती ब्राह्मण कन्येच्या घरी जाऊन तिला कुंकू देते. सोमवती अमावास्येच्या दिनी विशेष व्रत करते आणि पिंपळाच्या झाडाचे पूजनही करते. या व्रतामुळे तिचा पती सुखरूप राहतो, असे कथाख्यान पुराणात सापडते.