'या' व्यक्तींवर नेहमी राहते शनीची कृपादृष्टी; साडेसातीचा पडत नाही प्रतिकूल प्रभाव

By देवेश फडके | Published: January 9, 2021 08:11 PM2021-01-09T20:11:01+5:302021-01-09T20:18:05+5:30

ज्योतिषशास्त्रात शनी हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शनी साडेसाती आणि ढिय्या दशा हा अधिक कष्टकारक मानल्या जातात. मात्र, काही राशीच्या व्यक्तींवर शनीचा प्रतिकूल प्रभाव पडत नाही, असे सांगितले जाते. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर शनीचा वाईट प्रभाव पडत नाही? जाणून घेऊया...

शनीचे केवळ नाव घेतले तरी, अनेकांच्या भुवया उंचावतात. मनात विविध प्रकारचे विचार येतात. शनीचा प्रतिकूल प्रभाव आणि छाया यांविषयी अनेक मान्यता असल्याचे पाहायला मिळते. ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचे चलन, ग्रहांची स्थिती, जन्मकुंडलीतील त्यांचे स्थान यांवरून अनेकविध गोष्टींचा आढावा घेतला जातो. यामध्ये एखाद्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व, गुण-दोष, स्वभाव आणि भविष्यकालीन घटनांचा मुख्यत्वे करून समावेश केला जातो. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे वेगळेपण अधोरेखित करण्यात आले आहे. यानुसार, राहु-केतु यांना छाया ग्रह, तर शनीला क्रूर ग्रह मानले गेले आहे.

ग्रहमंडळातील शनी हा न्यायाधीश असून, तो न्यायसत्तेचे प्रतिक मानला गेला आहे. तसेच शनी हा अतिशय शिस्तप्रिय ग्रह आहे. त्यामुळे शनी हा जीवनास कार्यरत करणारा महत्त्वाचा ग्रह आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनीला असतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

शनी हा व्यक्तीला त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि पूर्वकर्मानुसार फळ प्रदान करत असतो. जी व्यक्ती प्रामाणिकपणे आणि मेहनतीने कार्यरत राहते, अशा व्यक्तींवर शनीची कृपादृष्टी कायम राहते. एखाद्या व्यक्तीची साडेसाती किंवा ढिय्या दशा सुरू असली, तरी अधिक मेहनती आणि प्रामाणिक व्यक्तींवर शनीचा प्रतिकूल प्रभाव पडत नाही. शनीच्या कृपादृष्टीमुळे त्यांचे कष्ट कमी होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

शनीचे एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील स्थान आणि त्याचा पडणारा प्रतिकूल प्रभाव यांवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. शनीची ढिय्या दशा आणि साडेसाती ही सर्वांत प्रभावशाली मानली जाते. शनी कष्टकारक मानला गेला आहे. शनीची कृपादृष्टी लाभणे सर्वोत्तम आणि शुभ लाभदायक मानले गेले आहे. सुख, समृद्धी, भरभराट, आनंद, समाधान, धन, वैभव, करिअर, कार्यक्षेत्र अशा अनेक गोष्टींवर शनीचा प्रभाव पडू शकतो.

सध्याच्या घडीला मिथुन आणि तुळ राशीच्या व्यक्तींची ढिय्या दशा सुरू आहे. तसेच धनु, मकर आणि कुंभ या तीन राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरू आहे. धनु राशीच्या व्यक्तींचा अखेरचा टप्पा, मकर राशीच्या व्यक्तींचा मधला टप्पा, तर कुंभ राशीच्या व्यक्तींचा पहिला टप्पा साडेसातीचा सुरू आहे.

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी तिसऱ्या, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानी असेल, तर अशा व्यक्तींवर शनीची अवकृपा होत नाही किंवा प्रतिकूल प्रभाव पडत नाही. शनी कुंडलीतील उच्च स्थानी असेल, तर शनी प्रतिकूल न राहता अनुकूल होतो, असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

शनी मकर आणि कुंभ या दोन राशीचे स्वामी मानले जातात. राशीस्वामी असल्यामुळे या दोन राशीच्या व्यक्तींवर साडेसाती सुरू असली, तरी शनीचा प्रतिकूल प्रभाव पडत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच तुळ ही शनीची उच्च राशी मानली गेली आहे. त्यामुळे शनी साडेसाती आणि ढिय्या दशा यांचा प्रतिकूल प्रभाव या राशीच्या व्यक्तींवर पडत नाही, असे सांगितले जाते.