Lunar Eclipse 2021: कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण: ग्रहणानंतर कोरोना संकट टळेल?; ‘असा’ पडू शकतो देश, जगावर प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:10 PM2021-11-16T14:10:08+5:302021-11-16T14:16:13+5:30

कार्तिक पौर्णिमेला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा देश आणि जगावर नकारात्मक प्रभाव (Lunar Eclipse November 2021 Effect in Marathi) पडू शकतो, असे सांगितले जात आहे.

सन २०२१ मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील असणार आहे. हे चंद्रग्रहण शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण असल्याचे बोलले जात आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. (Lunar Eclipse November 2021)

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१ रोजी चंद्रग्रहण असून, ते कृतिका नक्षत्रात होत आहे. या चंद्रग्रहणावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान असेल. अशा प्रकारचे चंद्रग्रहण तब्बल ६०० वर्षांनी होत असल्याचे सांगितले जात आहे. (Partial Lunar Eclipse)

यापूर्वी सुमारे ५८० वर्षांपूर्वी म्हणजेच १८ फेब्रुवारी १४४० रोजी झाले होते. त्यानंतर आता १९ नोव्हेंबर २०२१ रोजी असे चंद्रग्रहण आहे. तसेच यानंतर ८ फेब्रुवारी २६६९ रोजी असे चंद्रग्रहम होईल, असे सांगितले जात आहे. (Chandra Grahan November 2021)

कार्तिक पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण आंशिक स्वरुपातील असले तरी त्याचा कालावधी तब्बल ३ तास ४८ मिनिटे आणि २४ सेकंदाचा असणार आहे. हे चंद्रग्रहण साधारणपणे सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू होऊन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपेल, असे सांगितले जात आहे. (Chandra Grahan on Kartik Purnima 2021)

या चंद्रग्रहणाचा देश आणि जगावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. वराहमिहीर यांच्या बृहत् संहितेमध्ये अशा प्रकारच्या चंद्रग्रहणाचे परिणाम विषद करण्यात आले आहे. या ग्रहणावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान असेल. आताच्या घडीला राहुदेखील वृषभ राशीत आहे. त्यामुळे दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांठी हे ग्रहण शुभ नसेल, असे म्हटले जात आहे. (Lunar Eclipse November 2021 Effect in Marathi)

कार्तिक पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण पशुपालन करणाऱ्यांसाठी अधिक कष्टदायक आणि समस्याकारक ठरू शकते. तसेच या ग्रहणानंतर दुधाचे भावही वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला राहु आणि केतु अनुक्रमे वृषभ आणि वृश्चिक राशीत आहेत. याचा प्रभाव कोरोना संकटावर अधिक पडू शकतो, असे म्हटले जात आहे.

वृषभ राशीचा अंमल असणाऱ्या बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये अतिवृष्टी होऊन मोठे नुकसान होऊ शकते. तसेच दक्षिण भारतात मुसळधार पावसामुळे हवामानात नोंदनीय बदल घडू शकतो, यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. संपूर्ण भारतात थंडीचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

चंद्रग्रहणाच्या कुंडलीनुसार, जलतत्वाची मीन राशीत लग्न उदय होत आहे आणि सूर्य आणि चंद्र दोन्ही जलतत्वाच्या राशीत नवांशात स्थित असतील. यामुळे राजकारणातही मोठ्या घडामोडी होऊ शकतात. बर्फवृष्टी होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

वृश्चिक राशीचा अंमल असणाऱ्या दिल्ली तसेच एनसीआर भागात या चंद्रग्रहणाच्या काही दिवसांनंतर कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळू शकते. तसेच युरोप आणि अमेरिकेत कोरोनाचा मोठा प्रमाणावर फैलाव होऊन काही ठिकाणी कठोर प्रतिबंध लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कार्तिकी पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण उत्तर युरोप, अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागराच्या भागात आणि आशियातील बहुतांश भागांमध्ये दिसेल. काहींच्या मते हे ग्रहण भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेशमधील काही भागांमध्ये पाहता येऊ शकेल.

भारतातील बहुतांश भागात हे चंद्रग्रहण दिसणार नसल्याने याचे वेदादी नियम पाळू नयेत. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे पंचांगकर्त्यांकडून सांगण्यात येते. तसेच कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये पाळली नाही, तरी चालतील, असे सांगण्यात आले आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ राहील. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मेष, वृषभ, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात काळजी घ्यावी. या राशींसाठी ग्रहण शुभ नाही, असे सांगितले जात आहे.